भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगचे मत

आगामी प्रो हॉकी लीगमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिना यांच्यासारख्या मातब्बर संघांविरुद्धच्या कामगिरीआधारे टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या दृष्टीने भारताच्या तयारीची चाचपणी होईल, असे मत भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने व्यक्त केले. पाच महिने चालणाऱ्या ‘एफआयएच’ प्रो हॉकी लीगला १८ जानेवारीला प्रारंभ होत असून, यात आठ मातब्बर संघ सहभागी होणार आहेत.

‘‘ऑलिम्पिकमधील गटसाखळीत अव्वल दोन जणांमध्ये स्थान मिळवणे, हे आमचे प्राथमिक लक्ष्य असेल. भारताच्या गटातील ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनाचा पुढील वर्षी प्रो हॉकी लीगमध्ये सामना करावा लागणार आहे. या सामन्यांद्वारे भारताच्या तयारीचा अंदाज येऊ शकेल. मग त्यानुसार कामगिरीत आणि रणनीतीमध्ये सुधारणा करता येईल,’’ असे मनप्रीत म्हणाला.

रशियाला दोन सामन्यांच्या मालिकेत नमवून ऑलिम्पिक पात्रता साधणाऱ्या भारताच्या पुरुष संघाचा ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत अ-गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील ऑस्ट्रेलिया, गतविजेते अर्जेटिना, यजमान जपान, स्पेन आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.

‘‘ऑलिम्पिकमध्ये सोपी कार्यक्रम पत्रिका कधीच नसते. अ-गटात ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिनानंतर जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम भारताचे आहे. ब-गटात बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, गेट्र ब्रिटन, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यामुळे अ-गटापेक्षा ब-गट अधिक खडतर आहे,’’ असे २७ वर्षीय मनप्रीतने सांगितले.