प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बा संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने अखेरच्या क्षणांमध्ये यू मुम्बाची झुंज मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत बंगालसमोर दबंग दिल्लीचं आव्हान असणार आहे. ३७-३५ च्या फरकाने बंगालने सामना जिंकला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 Semi Final 1 : गतविजेत्या बंगळुरु बुल्सचं आव्हान संपुष्टात, दिल्ली अंतिम फेरीत

बंगाल वॉरियर्सच्या संघाने या सामन्यात अष्टपैलू खेळ केला. सुकेश हेडगे, मोहम्मद नबीबक्ष आणि के.प्रपंजन या चढाईपटूंनी पहिल्या सत्रापासून आक्रमक खेळ करत बंगालला आघाडी मिळवून दिली. यू मुम्बाच्या खेळाडूंनीही चांगली झुंज दिली, मात्र बचावफळीत सुरिंदर सिंहचा अपवाद वगळता अन्य खेळाडूंचं फॉर्मात नसणं यू मुम्बाला महागात पडलं. अभिषेक सिंह आणि संदीप नरवालने आपल्या परीने चढाई आणि बचावात चांगले गुण कमावले, मात्र पहिल्या सत्रापर्यंतही बंगालच्या संघाने आपली आघाडी कायम राखण्यात यश मिळवलं.

दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या खेळाडूंनी बंगालला चांगली झुंज दिली. बदली खेळाडू म्हणून संघात संधी मिळालेल्या अजिंक्य कापरेने चढाईमध्ये महत्वाच्या गुणांची कमाई करत यू मुम्बाची आघाडी कमी केली. यानंतर अभिषेक आणि अर्जुन देशवालनेही चढाईत गुणांची कमाई करत बंगालला सर्वबाद करत आपली पिछाडी कमी केली. मात्र शेवटच्या काही सेकंदांमध्ये अर्जुन देशवालचा चढाईत गुण मिळवण्याचा प्रयत्न फोल ठरला. ज्यामुळे बंगालने ३७-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली.