प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात गतविजेत्या बंगळुरु बुल्सने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानावर बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात बंगळुरु बुल्सने यूपी योद्धाची झुंज ४८-४५ अशी मोडून काढली. निर्धारित वेळेत सामना ३६-३६ अशा बरोबरीत सुटल्यामुळे ६ मिनीटांच्या अतिरीक्त वेळेत सामना खेळवण्यात आला. बंगळुरुच्या पवन शेरावतने चढाईत यूपी योद्धाच्या बचावफळीला खिंडार पाडत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पहिल्या सत्रात यूपी योद्धाच्या चढाईपटूंनी आक्रमक सुरुवात करत सामन्याची सुत्र आपल्या हातात घेतली. श्रीकांत जाधव, रिशांक देवाडीगा यांनी चढाईत आणि बोनस गुण मिळवत बंगळुरु बुल्सवर दबाव आणला. गतविजेता बंगळुरु बुल्सचा संघ पहिल्या सत्रात आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसत नव्हता. यूपी योद्धाच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्यात बंगळुरु बुल्सचे बचावपटू अपयशी ठरत होते. पहिल्या सत्रात एका क्षणापर्यंत यूपी योद्धाकडे १५-५ अशी आघाडी होती. मात्र बंगळुरु बुल्सच्या पवन शेरावतने फॉर्मात येत चढाईत झपाट्याने गुण मिळवण्यास सुरुवात केली. पवनच्या या आक्रमक खेळामुळे बंगळुरुने अखेरच्या सत्रात दमदार पुनरागमन करत यूपी योद्धाला चांगलीच झुंज दिली. पहिल्या सत्राच्या अखेरीस यूपी योद्धाचा संघ २०-१७ अशी निसटती आघाडी राखण्यात यशस्वी ठरला होता.

पहिल्या सत्रात अखेरच्या मिनीटांमध्ये बंगळुरुच्या खेळाडूंनी दिलेली झुंज पाहून यूपी योद्धाने दुसऱ्या सत्रात सावध खेळ करायला सुरुवात केली. यूपी योद्धाचा संघ बॅकफूटला गेलेला पाहून बंगळुरु बुल्सच्या बचावफळीने आपल्या फॉर्मात येत यूपी योद्धा संघावर दबाव टाकायला सुरुवात केली. पवन शेरावतनेही आपल्या धडाकेबाज चढायांच्या जोरावर यूपी योद्धाला बॅकफूटला ढकललं. मात्र सामना संपायला १० मिनीटं शिल्लक असतानाही यूपी योद्धाने आपली ३-४ गुणांची निसटती आघाडी कायम ठेवली होती.

सामना संपायला शेवटची ५-७ मिनीटं शिल्लक असताना यूपी योद्धाने पुन्हा एकदा सामन्यात आघाडी घेतली. यूपी योद्धा संघाच्या बचावफळीतल्या खेळाडूंनी ३ खेळाडूंनिशी खेळण्याची रणनिती आखत पकडी केल्या. यामुळे मोक्याच्या क्षणी यूपी योद्धा संघाने आपली आघाडी वाढवली. मात्र ही आघाडी कायम राखण्यात यूपी योद्धा पुन्हा अपयशी ठरली. बंगळुरुकडून पवन शेरावतने पुन्हा एकदा चढाईत गुणांची कमाई करुन आघाडी घेतली. सामना संपायला शेवटची ५ सेकंदर असताना बंगळुरु बुल्स ३६-३५ अशी एका गुणाने आघाडीवर होती. मात्र यूपी योद्धाने अखेरच्या चढाईत एक गुण कमावत सामन्यात पुन्हा ३६-३६ अशी बरोबरी साधली.

मर्यादीत वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे अखेरीस पंचांनी दोन्ही संघांना चढाईसाठी ३-३ मिनीटांचा वेळ वाढवून दिला. पहिल्या ३ मिनीटांनंतर यूपी योद्धाचा संघ एका गुणाने आघाडीवर होता. मात्र अखेरच्या ३ मिनीटांमध्ये पवन शेरावतने चढाईत पुन्हा एकदा ४ गुणांची कमाई करत मोक्याच्या क्षणी यूपी योद्धाला पिछाडीवर ढकललं. शेवटच्या मिनीटांत यूपी योद्धाला सर्वबाद करत बंगळुरु बुल्सने निर्णयाक आघाडी घेतली. अखेरच्या क्षणात यूपी योद्धाने झुंज देत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पवन शेरावतने संयमी खेळ करत बंगळुरु बुल्सच्या ४८-४५ असं शिक्कामोर्तब केलं.