चढाईपटू आणि बचावफळीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अहमदाबादच्या मैदानात झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीने गतविजेत्या बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आणलं आहे. बंगळुरुच्या बचावफळीतील खेळाडूंची खराब कामगिरी हे त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. ४४-३८ च्या फरकाने दबंग दिल्लीने उपांत्य सामन्यात बाजी मारली.

साखळी फेरीपासून सर्वोत्तम खेळ करणाऱ्या दबंग दिल्लीने उपांत्य सामन्यातही आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवला. यंदाच्या हंगामात दिल्लीच्या आक्रमणाचा कणा ठरलेल्या नवीन कुमारने उपांत्य सामन्यातही आक्रमक खेळ केला. नवीन आणि चंद्रन रणजितने धडाकेबाज चढाया करत बंगळुरुच्या बचावफळीला खिंडार पाडलं. नवीन कुमारने १५ तर चंद्रन रणजीतने ९ गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे अनिल कुमार-विजय-रविंदर पेहल-जोगिंदर नरवाल या बचावपटूंनीही बंगळुरुच्या चढाईपटूंच्या सुरेख पकडी करत, गतविजेत्या संघाचा आघाडी घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

बंगळुरु बुल्सकडून या सामन्यातही पवन शेरावतने एकाकी झुंज दिली. पवनने चढाईत १८ गुणांची कमाई केली. त्याला सुमित सिंह आणि रोहित कुमारने चांगली साथ दिली. मात्र बचावफळीतल्या खेळाडूंचं अपयश हे बंगळुरुच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. १९ ऑक्टोबरला दबंग दिल्लीचा संघ यू मुम्बा आणि बंगाव वॉरियर्स यांच्यातील विजेत्या संघाशी दोन हात करेल.