प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बा संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. अहमदाबादच्या मैदानात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने यू मुम्बाची झुंज मोडून काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. सातव्या हंगामात यू मुम्बाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अजिंक्य कापरेचा अपवाद वगळता एकाही स्थानिक खेळाडूला संधी न दिल्यामुळे यू मुम्बाला टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये पात्र झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात अजिंक्यला संघात खेळण्याची संधी मिळाली. बंगालविरुद्ध सामन्यात यू मुम्बाला ३७-३५ अशा दोन गुणांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 Semi Final 2 : अटीतटीच्या लढतीत बंगाल वॉरियर्सची बाजी, यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यू मुम्बाचे सहायक प्रशिक्षक उपेंद्र कुमार यांनी अजिंक्य कापरेला याआधी अधिक संधी मिळायला हवी होती असं म्हणत आपली चूक मान्य केली. उपांत्य सामन्यातही अजिंक्यला बदली खेळाडू म्हणून संघात जागा मिळाली, ज्यामध्ये त्याने चढाईत ५ गुण मिळवत आपली निवड सार्थ ठरवली. “अजिंक्य चढाईत आम्हाला गूण मिळवून देईल अशी आम्हाला आशा होती, ज्याप्रमाणे त्याने झटपट गुणांची कमाई केली. मात्र यानंतरही त्याला अधिक संधी मिळायला हवी होती. तो चांगल्या फॉर्मात होता आणि अखेरच्या टप्प्यात तो अधिक चांगला खेळू शकला असता. मात्र त्याला संधी मिळाली नाही ही आमची चूक आहे.”

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : नवीन कुमार ठरतोय दबंग दिल्लीचा हुकुमाचा एक्का

अजिंक्यला चढाईची संधी न देण्याचा निर्णय कोणी घेतला असं विचारलं असता उपेंद्र कुमार म्हणाले, “कर्णधार फजल अत्राचलीने हा निर्णय घेतला होता. अर्जुन देशवाल हा आमचा मुख्य चढाईपटू असल्यामुळे त्याच्यावर अधिक विश्वास दाखवला गेला.” १९ तारखेला दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स या संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. त्यामुळे यंदा प्रो-कबड्डीला नवीन विजेता मिळणार हे स्पष्ट झालं आहे.