News Flash

कबड्डीची पकड अन् यशाची मिठी!

श्रीकांतच्या कुटुंबाचा शेतीमधून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून उदरनिर्वाह चालायचा.

श्रीकांत जाधव

दहिगावणेतील श्रीकांतच्या जीवनाला वेगळी कलाटणी

बालपणी अर्जुन पुरस्कार विजेत्या पंकज शिरसाटचा चतुरस्र खेळ पाहून अहमदनगरमधील दहिगावणे खेडेगावातील श्रीकांत जाधवने कबड्डीपटू होण्याचा निर्धार केला. श्रीकांतच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. परंतु प्रो कबड्डी लीगमधील यश आणि मध्य रेल्वेत मिळालेली नोकरी यामुळे कबड्डीने त्याचे आयुष्य पालटले आहे. हा युवक आता यू मुंबा संघाचा आधारस्तंभ झाला आहे.

श्रीकांतच्या कुटुंबाचा शेतीमधून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातून उदरनिर्वाह चालायचा. परंतु कालांतराने त्याच्या वडिलांनी एक छोटेखानी दुकान काढले. श्रीकांतला शालेय जीवनात अ‍ॅथलेटिक्सची आवड होती. परंतु घराजवळ कबड्डीचे मैदान असल्याने या खेळाचा लळा लागला. मग कबड्डीत कारकीर्द घडवायचा निर्धार केव्हा केला, या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकांत म्हणाला, ‘‘भारताचा कबड्डीपटू पंकज शिरसाटचा त्या वेळी विलक्षण दबदबा होता. सहाव्या इयत्तेत असताना पंकजचा खेळ पाहण्यासाठी मी बीडच्या देवराई येथे गेलो होतो. त्याच्या खेळाचा रुबाब पाहून मी भारावलो आणि मनाशी निर्धार केला की, आपणसुद्धा कबड्डीत देशाचे प्रतिनिधित्व करायचे.’’

शाळेत अभ्यासात श्रीकांतची फारशी हुशारी नव्हती, त्यामुळे शिक्षक नेहमीच त्याची कानउघाडणी करायचे. परंतु तेच आता कौतुक करू लागले आहेत. याबाबत श्रीकांत म्हणाला, ‘‘कबड्डी उद्या तुझे पोट भरणार नाही, असा शिक्षक मला सावधानतेचा इशारा द्यायचे. पण आता मला प्रो कबड्डी चमकताना पाहून त्यांना माझा हेवा वाटतो. गेल्या काही दिवसांत अनेक शिक्षकांचे मला फोन आले. घरचे शेतीकाम करूनही कबड्डीवरचे माझे कबड्डीप्रेम त्यांना दिसायचे. परंतु कबड्डी सोडून अभ्याससुद्धा यायला हवा, अशी त्यांची

धारणा होती म्हणून अभ्यासावर ते वचक ठेवायचे.’’

श्रीकांतने शालेय वयात राष्ट्रीय स्तरापर्यंत चकण्यासाठी बरीच मेहनत घेतली. परंतु महाराष्ट्राच्या संघात त्याची निवड झाली नाही. मात्र दहावीत असताना राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धा खेळण्याचा मान त्याला मिळाला. त्यामुळे कांदिवलीच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साइ) प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली. तिथे पंकज शिरसाट, नितीन मदने आणि काशिलिंग आडके यांचे मार्गदर्शन त्याला मिळू लागले. त्यामुळे त्याचा खेळ अधिकाधिक विकसित होऊ लागला.

अकरावीत असताना आणखी एका घटनेने श्रीकांतने कबड्डी जवळपास सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही आठवण सांगताना श्रीकांत म्हणाला, ‘‘त्या वेळी ‘साइ’मध्ये १८ वर्षांखालील खेळाडूंनाच इथे थांबता येईल, असा एक नियम आला. त्यामुळे बॅग घेऊन दहिगावणेत परतावे लागले. मग घरी आल्यावर लोक हिणवू लागले. कबड्डीपटू व्हायला गेला होता, काय झाले? असा सवाल करू लागले. तब्बल आठ महिने मी कबड्डीचा त्याग केला होता. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे भवितव्य कसे घडवायचे, आता पुढे काय करायचे, हा प्रश्न आवासून समोर होता. मग एका मित्राच्या मदतीमुळे पुन्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तोच माझा अभ्यास करून घ्यायचा. त्यानंतर नगरला पोलीस दलात रुजू होण्यासाठी प्रयत्न केले, परंतु तोही प्रयत्न अपयशी ठरला. मग विदर्भाकडून वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत खेळलो आणि पुन्हा कबड्डीच्या वाटेवर परतलो.’’

प्रो कबड्डीच्या वाटचालीबाबत श्रीकांत म्हणाला, ‘‘पहिल्या व दुसऱ्या प्रो कबड्डीच्या हंगामात मी जयपूर पिंथर्स संघात होतो. मग तिसऱ्या व चौथ्या हंगामात बंगाल वॉरियर्सचे प्रतिनिधित्व केले. पण दुखापतीमुळे आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे पुरेशी संधी मिळाली नाही. पण यंदाच्या हंगामात मला गुणवत्ता दाखवायची उत्तम संधी मिळाली आणि मी तिचे सोने केले आहे.’’

सध्या श्रीकांत शहाड येथे मध्य रेल्वेच्या सेवेत कार्यरत आहे. याशिवाय इतिहास विषय घेऊन तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे. कबड्डीमुळे अर्थार्जनाचा प्रश्न मिटल्यामुळे एक भाऊ आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी तोच आता समर्थपणे वाहत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 3:57 am

Web Title: pro kabaddi change u mumba player shrikant jadhav life
Next Stories
1 अश्वारोहक व रिक्षावाले काकांच्या सहभागाने फुटबॉल दिन साजरा
2 महाराष्ट्र ‘मिशन वन मिलियन’ला दुप्पट यश
3 भारतीय महिला हॉकी संघाची पुन्हा हाराकिरी
Just Now!
X