प्रोकबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाने अपेक्षेप्रमाणेच मोठी उंची गाठली. देशाच्या कानाकोपऱ्यापासून परदेशातही या माध्यमातून कबड्डी रुजली. सामन्यातील थरार, खेळाडूंचा खेळ हे सारे काही सर्वसामान्य कबड्डीरसिकांना भावले. ‘टीआरपी’च्या यादीत प्रो कबड्डीने लक्षवेधी भरारी घेतली. ‘प्रो कबड्डी’ म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गवसलेल्या संयोजकांनी आता वर्षांतून दोनदा ही लीग खेळवण्याचा घाट घातला आहे. परंतु ही कोंबडी कापून खाण्याची घाई केल्यास कबड्डीच्या भावी वाटचालीतच अनंत अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान यंदा साखळीतच संपुष्टात आले, तर यू मुंबाने दुसऱ्या हंगामात आपली छाप पाडली. याचप्रमाणे २१ लाख रुपये मोजून दोन इराणी खेळाडू संघात घेणाऱ्या तेलुगू टायटन्सने तिसरे स्थान पटकावले. यंदाच्या लीगमधील ६० सामन्यांचा आढावा घेतल्यास तेलुगू ‘टाय’टन्स हा संघ बरोबरीसाठी चर्चेत राहिला. स्पध्रेतील चार बरोबरीत सुटलेल्या सामन्यांपैकी तीन बरोबरीचे सामने हे टायटन्सचे. हैदराबादमध्ये टायटन्सच्या बालेकिल्ल्यात दोन बरोबरीच्या सामन्यांचा थरार कबड्डीरसिकांनी अनुभवला. अखेरची चढाई निर्णायक असताना जयपूरच्या जसबीर सिंगसारख्या आक्रमक चढाईपटूने निष्फळ चढाईचा मार्ग पत्करून बरोबरी स्वीकारली. मग पत्रकार परिषदेत जसवीर म्हणाला, ‘‘आम्ही जिंकलो आहोत, असे वाटल्याने अखेरच्या चढाईत मी जोखीम पत्करली नाही.’’ पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात राहुल चौधरीसारख्या हरहुन्नरी खेळाडूला २८व्या मिनिटांनंतर विश्रांती देण्यात आली. शेवटच्या काही चढायांमध्ये सामना फिरवू शकण्याची क्षमता असतानाही राहुल पुन्हा मैदानावर परतला नाही. पण दीपक हुडाची अखेरची चढाईसुद्धा सामन्याचे चित्र पालटू शकली नाही. दिल्लीत दबंग दिल्लीचा तेलुगू टायटन्स विरुद्धचा सामना पंचांच्या शिटीनिशी निकाली ठरवल्यानंतर ‘रेफरल’द्वारे पुनर्आढावा झाल्यावर बरोबरीत सुटला. असे अनेक रोमहर्षक सामने प्रो कबड्डीत यंदा पाहायला मिळाले. परंतु बरोबरीत सामने सुटणारच नाहीत, हे कटाक्षाने पाळले तर पाच-पाच चढायांचा डाव खेळवायला हवा.
पाटणा पायरेट्सचा कर्णधार राकेश कुमार पाच सामन्यांनंतर प्रो कबड्डीच्या क्षितिजावरून लुप्त झाला. त्याचे कोणतेही अधिकृत पत्रक काढण्याचे सौजन्य संयोजकांनी दाखवले नाही. राकेशला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित हंगाम खेळू शकणार नाही, असे पाटण्याने स्पष्ट केले. परंतु भारताच्या कर्णधाराला खरेच दुखापत झाली होती का? की अन्य काही कारणास्तव तो खेळू शकला नाही, हे सत्य मात्र गुलदस्त्यातच राहिले. ज्या खेळाडूला पहिल्या हंगामात सर्वाधिक बोली लागली, तो अचानक स्पध्रेबाहेर गेल्याचे कोणतेही सोयरसुतक बाळगण्यात आले नाही. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या पाटण्याच्या संघाचे प्रशिक्षक कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेपर्यंत मिळू शकले नाही.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात फ्रेंचायझी पर्यायाने संघव्यवस्थापक अधिक शहाणे झाल्याचे प्रत्ययास आले. नवनीत गौतमसारख्या अनुभवी खेळाडूला संघात स्थान देण्यापेक्षा ताज्या दमाच्या नव्या खेळाडूला संधी देता येईल. नेतृत्वाची धुरा सांभाळता येत नसेल, तर कर्णधार बदलता येऊ शकतो. अशा अनेक रणनीती पाहायला मिळाल्या. खेळाडूंचा दोन वर्षांसाठीचा करार यंदाच्या हंगामानिशी संपला आहे. त्यामुळे आता नव्याने लिलावप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात उदयोन्मुख खेळाडूंची नवी फौज प्रत्येक संघात पाहायला मिळेल.
सध्या तरी प्रो कबड्डीपुढील सर्वात मोठे आव्हान वर्षांतून दोनदा स्पर्धा घेण्याचे आहे. संयोजक स्टार स्पोर्ट्स हे शिवधनुष्य पेलतीलसुद्धा. खेळाडूंना वारंवार कबड्डी पाहण्याची सवय लावण्याचा त्यांचा हेतू आहे. परंतु ‘अति तिथे माती’ होणार नाही ना? मुळात दीड महिन्यांच्या प्रो कबड्डीच्या हंगामातील १४ ते १६ सामन्यांना सामोरे जाताना खेळाडूंची दमछाक होते. दुखापती टाळणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे, हीसुद्धा काळजी त्यांना घ्यावी लागते. मागील वर्षी प्रो कबड्डीनंतर आशियाई क्रीडा स्पध्रेला सामोरे जाताना खेळाडूंना झालेल्या दुखापतींचे वास्तव समोर आले होते. वर्षांतून दोनदा हंगाम म्हणजे, दुखापतींशी हातात हात घालूनच वावरणे. परंतु किमान १५ ते २० लाख रुपये प्रो कबड्डी खेळून वर्षांला मिळणार असतील, तर खेळाडू ही जोखीमसुद्धा सहजपणे पत्करतील. पण यामुळे व्यावसायिक कबड्डीचा बट्टय़ाबोळ होईल. इतके उत्पन्न मिळाल्यावर कबड्डीपटूला नोकरीची गरज उरणार नाही. त्यामुळे दिग्गज व्यावसायिक संघांमध्ये नावाजलेले खेळाडू क्वचितच दिसतील. पर्यायाने जी काही थोडीफार कबड्डीसाठी व्यावसायिक भरती होते, तीसुद्धा होणे कालांतराने बंद होईल. रोजगाराचा प्रश्न प्रो कबड्डी सोडवू शकते, हा आत्मविश्वास रूढ झाल्याने हेच लक्ष्य घेऊन खेळाडू आपली कारकीर्द घडवायला लागेल. व्यावसायिकतेची नवी समीकरणे रुजू लागल्यामुळे कबड्डीचा आत्मा हरवेल आणि नवे नियम, नवे पैलू पाडलेले प्रो कबड्डीचे गारूड खेळाडूंच्या नसानसांत भिनेल. परंतु सोन्याचे अंडे देणारी ही प्रो कबड्डी यशस्वीतेच्या शिखरावर टिकेल, की आयपीएलप्रमाणे तिचा आलेख खालच्या दिशेने प्रवास करेल, याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल.
prashant.keni@expressindia.com