कबड्डीचा सामना फक्त आक्रमण आणि चढायांच्या जोरावरच जिंकला जात नाही, तर त्यासाठी चोख रणनीतीची अंमलबजावणीही करावी लागते. विजयाची सीमारेषा ओळखत बचावात्मक चढाया आणि आक्रमक पकडींचे महत्त्व दाखवून देत चाणाक्ष जयपूर पिंक पँथर्सने यजमान बंगळुरू बुल्सवर २७-२५ असा विजय मिळवून देत गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले. घरच्या मैदानात सलग दुसऱ्या पराभवामुळे बंगळुरूला तिसरे स्थान गमवावे लागले. अन्य एका लढतीत बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटणवर अटीतटीच्या लढतीत ३१-२८ अशी मात केली आणि गुणतालिकेत १० सामन्यांनंतर फक्त एकमेव विजय गाठीशी असलेल्या पुण्याचा संघ तळाशीच राहिला.
जयपूरने सुरुवातीला बहारदार खेळ करत मध्यंतरापर्यंत १७ -११ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर जयपूरचा कर्णधार जसवीर सिंगने सामन्याच्या २३व्या मिनिटापासून अखेपर्यंत निष्फळ चढाया करत वेळखाऊपणा केला आणि बंगळुरूला विजयापासून दूर रोखले. हा प्रयत्न जयपूरच्या अंगलट आलाही असता, पण वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि उत्तम पकडींच्या जोरावर त्यांनी हा सामना जिंकला. जयपूरकडून सोनू नरवालने दोन बोनस गुणांसह आठ गुणांची कमाई केली, तर रण सिंग, कुलदीप सिंग आणि सी. अरुण यांनी प्रत्येकी तीन पकडी केल्या.
गुणतालिकेतील शेवटचे स्थान सोडण्यासाठी पुण्याच्या संघाने जोरदार प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना अपयश आले. बंगालकडून श्याम कुमार साहने पाच पकडी केल्या, तर सुनाल जयपालने सहा पकडींसह एकूण आठ गुण कमवले. पण मध्यंतरानंतर १२-१२ अशी गुणसंख्या असताना अटीतटीच्या वेळी यांग कुन ली याने दोन गुण मिळवत संघाला प्रोत्साहन देण्याचे काम केले. पुण्याच्या संघाकडून रवी कुमारने एका सुपर कॅचसह सहा गुण मिळवले.
आजचे सामने  
बंगाल वॉरियर्स वि. पाटणा पायरेट्स
बंगळुरू बुल्स वि. दबंग दिल्ली
वेळ : रात्री ७.५० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी.