घरच्या मैदानावर तेलगू टायटन्सची प्रो-कबड्डीच्या इतिहासातली आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी, यंदाच्या पर्वात पहायला मिळाली आहे. घरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सने तेलगू टायटन्सवर ४३-३६ अशी मात केली. हा तेलगू टायटन्सचा सलग पाचवा पराभव ठरला आहे. याआधीही पाटणा पायरेट्सने तेलगू टायटन्सला पराभवाचा धक्का दिला होता.

आपल्या दोन पर्वातील विजेतेपदाचा लौकिक कायम राखत पाटण्याने या सामन्यातही खेळाला आक्रमकपणे सुरुवात केली. सुरुवातीची काही मिनीटं पाटण्याच्या संघाकडे ३-० अशी आघाडी होती. मात्र अनपेक्षितपणे तेलगू टायटन्सच्या संघानी चांगली लढत देत सामन्यात बरोबरी साधली. राहुल चौधरी आणि निलेश साळुंखेने केलेल्या काही चढायांमुळे तेलगू टायटन्सला हा करिष्मा साधता आला. मात्र हाती आलेल्या संधीचा फायदा घेण्यात तेलगू टायटन्स पुन्हा अपयशी ठरले.

जिथे पाटणा पायरेट्सला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेण्याची संधी तेलगूकडे होती, तिकडे बचावपटूंनी छोट्या छोट्या चुका करत पाटण्याला पॉईंट बहाल केले. पाटण्याकडून पहिल्या सत्रात सेनादलाच्या मोनू गोयतने काही सुरेख डावपेच लढवत आपल्या संघासाठी पॉईंट मिळवले. याच संधीचा फायदा घेत पाटणा पायरेट्सने तेलगू टायटन्सला पहिल्या सत्रात ऑलआऊट केलं. पहिल्या सत्रा अखेरीस पाटण्याच्या संघाकडे २३-१६ अशी आघाडी होती.

यानंतर दुसऱ्या सत्रात पाटण्याच्या संघाकडून कर्णधार प्रदीप नरवाल, मोनू गोयत, बचावपटूंमध्ये विशाल माने, सचिन शिंगाडे यांनी चमकदार कामगिरी करत सामन्याची सुत्र आपल्या हातात कायम ठेवली. दुसऱ्या सत्रात तेलगू टायटन्सने सामन्यात परतण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र वेळोवेळी पाटण्याच्या बचावफळीने ते हाणून पाडले. अखेरच्या सत्रात कोणताही दबाव न घेता पाटणाने अखेर सामना आपल्या खिशात घालण्यातही यश मिळवलं. या सामन्यासोबत प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातले हैदराबाद येथील सामने संपुष्टात आले असून उद्यापासून प्रो-कबड्डीचं वादळ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे धडकणार आहे.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीला प्रेक्षकांची पसंती कायम, पहिल्या दिवशी गाठला ५ कोटींचा प्रेक्षकवर्ग