News Flash

Pro Kabaddi Season 5 – ‘पाटणा’ एक्स्प्रेसची तेलगू टायटन्सच्या विजयरथाला धडक

गतविजेच्या पटणा पायरेट्सची धडाक्यात सुरुवात

पटणा पायरेट्सची तेलगू टायटन्सवर ३५-२९ अशी मात

यजमान तेलगू टायटन्सला आपल्या घरच्या मैदानावर दुसऱ्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा करिश्मा करुन दाखवला आहे, गेल्या दोन पर्वाचा विजेता संघ पटणा पायरेट्सने. पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीच्या संघाने जयपूर पिंक पँथर्सवर मात केल्याने दुसरा सामनाही तितकाच रंगतदार होईल अशी सर्वांची आशा होती. त्यातच प्रो-कबड्डीच्या इतिहासात सर्वोत्कृष्ठ रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप नरवाल आणि राहुल चौधरी यांच्यातलं हे द्वंद्व होतं.

कर्णधार राहुल चौधरी फॉर्मात असला की तेलगू टायटन्सचा संघ चांगली कामगिरी करतो, मात्र यदाकदाचीत त्याचा फॉर्म बिघडला की संपूर्ण संघाच्या कामगिरीवर त्याचा परिणाम होतो हे अनेकदा दिसून आलं आहे. आजच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात राहुल चौधरीने काही सुरेख पॉईंट मिळवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार प्रदीप नरवालला संघाबाहेर बसवण्यात तेलगूचे खेळाडू यशस्वी झाले. मात्र पटणा पायरेट्सने तितक्याच जोरात कमबॅक करत सामन्यात एका गुणाची आघाडी घेतली.

अखेरच्या सत्रात पटण्याचा मुंबईकर बचावपटू विशाल मानेने घेतलेल्या सुरेख पॉईंटचा संघाला फायदा झाला. विशाल मानेने विशेषकरुन राहुल चौधरीला टार्गेट करत आपल्या डॅशने त्याला मैदानाबाहेर केलं.

दुसऱ्या सत्रात मात्र पाटण्याच्या संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली. सेनादलाचा खेळाडू मोनू गोयत आणि कर्णधार प्रदीप नरवालने महत्वाच्या क्षणी चांगल्या रेड करत संघाला आघाडी मिळवून दिली. सामना संपायला अवघी काही मिनीटं बाकी असताना कर्णधार प्रदीप नरवालची ‘सुपर रेड’ या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. याचसोबत दुसऱ्या सत्रामध्ये तेलगू टायटन्सच्या राहुल चौधरीला सतत संघाबाहेर ठेवण्यात पटणाची बचावफळी यशस्वी झाली. यात महत्वाची भूमिका बजावली ती विशाल मानेने. निलेश साळुंखे, राहुल चौधरीला विशालने अनेक वेळा मध्यरेषेवर टॅकल करत बाहेरचा रस्ता दाखवला.

तेलगू टायटन्सकडून निलेश साळुंखेचा अपवाद वगळता एकाही खेळाडूने राहुलला साथ दिली नाही. भरवशाच्या राकेश कुमारलाही आजच्या सामन्यात काही फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. ज्यामुळे महत्वाच्या क्षणी तेलगू टायटन्सचा संघ सामन्यात पिछाडीवर पडला. तसेच दुसऱ्या सत्रात प्रो-कबड्डीच्या इतिहासातला आपला ५०० वा बळी मिळवण्याच्या नादात राहुलनेही काही चुका केल्या. ज्यामुळे त्याच्या खेळावर लगेच परिणाम दिसायला लागला.

गेल्या दोन पर्वाची विजेती टीम असलेल्या पटणा पायरेट्सने आपल्या पाचव्या पर्वाची सुरुवातही मोठ्या धडाक्यात केली आहे. त्यामुळे आपले आगामी सामने पटणा पायरेट्स कसे खेळते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 10:36 pm

Web Title: pro kabaddi league 2017 season 5 telugu titans vs patna pirates review
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – मराठ्यांनी पुन्हा ‘दिल्ली’ राखली
2 हार्दिक भारताचा बेन स्टोक्स बनू शकतो!
3 ‘या’ खेळाडूमुळे यू मुम्बा हरली सलामीचा सामना
Just Now!
X