प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातल्या दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या पुण्याने मुंबईच्या संघावर मात केली आहे. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेल्या दीपक हुडाच्या संघाने अनुप कुमारच्या यू मुम्बाला ३३-२१ अशा मोठ्या फरकाने हरवत, स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली. दुर्देवाने यू मुम्बाकडून कर्णधार अनुप कुमारचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली नाही. सामन्याच्या सुरुवातीपासून पुणेरी पलटणने आपली पकड मजबूत ठेवली होती. ज्याचा सामन्याच्या अखेरपर्यंत पुण्याच्या संघाला फायदाच झाला.

अनुप कुमारवर संघाचा भार –

आतापर्यंत प्रो-कबड्डीच्या पर्वात अनेक वेळा दिसून आलेलं आहे की अनुप कुमारच्या खांद्यावर संघाची जबाबदारी असायची. रेड करण्यापासून ते डिफेन्समध्ये पॉईंट घेण्यापर्यंत सर्व कामात अनुप आपली छाप सोडून जायचा. या सामन्यातही असचं काहीसं झालं.

यंदाच्या हंगामात अनुपच्या जोडीला काशिलींग अडके, शब्बीर बापू सारखे रेडर असूनही त्यांना मैदानात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पुण्याच्या बचावपटूंनी काशिलींग आणि शब्बीर बापूच्या प्रत्येक चालीचा अभ्यास केला होता. त्यामुळे दोघांनाही रेडदरम्यान मॅटच्या अखेरपर्यंत नेऊन जात, पुण्याच्या बचावपटूंनी दोन्ही रेडरना आपल्या जाळ्यात ओढलं.

काशिलींग आणि नितीन मदनेचा निराशाजनक खेळ –

महाराष्ट्राचे काशिलींग अडके आणि नितीन मदने यांच्याकडून या सामन्यात अनेक अपेक्षा होत्या. मात्र त्यानूसार खेळ करण्यात दोन्ही खेळाडूंना अपयश आलं. काशिलींग अडकेला पुण्याच्या संदीप नरवाल, गिरीश ऐर्नेक या बचावपटूंनी टार्गेट करत फारसे पॉईंट घेण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे अनुपवर आलेला दबाव कमी करुन, संघासाठी पॉईंट घेण्यात काशिलींग पुन्हा अपयशी ठरला.

पहिल्याच सत्रात पुणेरी पलटणकडून ऑलआऊट झाल्यानंतर मुम्बाने नितीन मदनेला संघात स्थान दिलं. मात्र पुण्याच्या बचावपटूंनी त्याचीही शिकार केली. दिपक हुडा, संदीप नरवाल यांच्यापुढे मुम्बाच्या एकाही खेळाडूची डाळ शिजताना दिसली नाही.

कमकुवत बचावाचा मुम्बाला फटका –

जोगिंदर नरवाल, डी. सुरेश कुमार यांच्यासारखे दिग्गज बचावपटू मुम्बाच्या संघात असताना मैदानात मात्र त्यांच्याकडून फारसा आशादायी खेळ झाला नाही. दिपक हुडासारख्या खेळाडूला टचलाईनवर टॅकल करणं जोगिंदर नरवालला जमलं नाही, याचवेळी दीपकने आपल्या रेडमध्ये ३ पॉईंट मिळवत पुणेरी पलटणला सामन्यात पुढे आणलं. मधल्या काळात यू मुम्बाने सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र पुण्याच्या बचावपटूंनी तो हाणून पाडला.

पुण्याच्या नवोदीत खेळाडूंची सुरेख कामगिरी –

दीपक हुडाला संघाचं कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय आज त्याने तंतोतंत सार्थ करुन दाखवला. याचसोबत मराठमोळ्या जी.बी.मोरे या चढाईपटूनेही आपल्या खेळीत काही चांगले पॉईंट घेतले. ज्याचा पुण्याच्या संघाला चांगलाच फायदा झाला.

दुसरीकडे राजेश मोंडलसारख्या खेळाडूनेही मुम्बाच्या खेळाडूंवर दबाव टाकत महत्वाच्या क्षणी आपल्या संघाला पॉईंट मिळवून दिले.

हरहुन्नरी संदीप नरवाल –

संदीप नरवालने आपल्या अष्टपैलू खेळाने यू मुम्बाच्या संघावर आपला धाक निर्माण केला होता. प्रतिस्पर्धी संघाचा रेडर आपल्या कोर्टमध्ये असताना, डिफेन्स लाईनमध्ये आपली जागा बदलणं, तसेच पर्स्युड करत समोरच्या संघात अफरातफरी माजवणं यासारखे काही नामी हातखंडे संदीप नरवालला चांगले जमतात.

आजच्या सामन्यात रेडदरम्यान २-३ वेळा बाद झाल्यानंतरही अनुप कुमार संदीप नरवालचा अंदाज घेत आपली रेड करत होता. त्यामुळे मुम्बाच्या संघावर मानसिक दबाव निर्माण करण्यात संदीप नरवाल आणि पुणेरी पलटण पुन्हा एकदा यशस्वी झाले.

डिफेन्समधे नसलेला ताळमेळ, रेडींगमध्ये इतर खेळाडूंची न मिळालेली साथ या गोष्टी आजच्या सामन्यात यू मुम्बाच्या पराभवाचं कारण ठरल्या आहेत. त्यामुळे आगामी सामन्यात आपल्या या चुकांवर लक्ष देऊन त्या सुधारण्याचं मोठं आव्हान अनुप कुमारच्या संघासमोर असणार आहे.

अवश्य वाचा – तेलगू टायटन्सची विजयी सुरुवात, तामिळ थलायवाजचा पराभव