प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी पुणेरी पलटण संघाने आज नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. गिरीश एर्नाककडे यंदाच्या मोसमात पुणेरी पलटण संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. पाचव्या हंगामात डाव्या कोपऱ्यावर बचावपटू म्हणून खेळताना गिरीशने सर्वोत्तम कामगिरी केली होती. यानंतर दुबईत झालेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा आणि आशियाई खेळांमध्येही गिरीश भारतीय संघाचा सदस्य होता.

प्रो-कबड्डीचे पहिले दोन हंगाम गिरीश पटणा पायरेट्स संघाकडून खेळला, यानंतर पुढचे दोन हंगाम गिरीशला बंगाल वॉरियर्स संघाने आपल्या संघात सामावून घेतलं. यानंतर पाचव्या हंगामात पुणेरी पलटणने गिरीशला आपल्या संघात समाविष्ट केलं. पाचव्या हंगामात गिरीश एर्नाकने डाव्या कोपऱ्यावर काही चांगल्या पकडी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. पुणेरी पलटण संघाच्या ट्विटर अकाऊंटवर गिरीशच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आलेली आहे.

पहिल्या दोन हंगामांमध्ये पुण्याच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र तिसऱ्या हंगामापासून पुण्याच्या संघाचं नशिब पालटलं. पाचव्या हंगामामध्येही पुणेरी पलटणने सर्वोत्तम ४ संघाच्या गटात प्रवेश केला होता, मात्र अंतिम फेरी गाठण्यात त्यांना अपयश आलं होतं, त्यामुळे यंदाच्या हंगामात गिरीश एर्नाकच्या नेतृत्वाखाली पुणेरी पलटणचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.