प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाचा लिलाव आज आणि उद्या मुंबईत

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात दीड कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह एकंदर सहा जणांनी एक कोटीचा टप्पा ओलांडण्यात यश मिळवले होते. मात्र या कोटय़धीश खेळाडूंपेक्षा उदयोन्मुख खेळाडूंनीच कामगिरी उंचावली. या पाश्र्वभूमीवर सोमवार आणि मंगळवारी मुंबईत होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाच्या लिलावात कोटी कोटी उड्डाणांना मर्यादा येण्याची चिन्हे आहेत. याऐवजी उदयोन्मुख खेळाडूंवरच फ्रेंचायझींचे विशेष लक्ष असेल, असा कबड्डीक्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

मागील वर्षी प्रो कबड्डीच्या लिलावात कोटय़वधी रुपये कमावणाऱ्या कबड्डीपटूंपैकी रिशांक देवाडिगा आणि फझल अत्राचाली या दोनच खेळाडूंचे संघ बाद फेरीपर्यंत पोहोचले. मात्र मोनू गोयत, राहुल चौधरी, नितीन तोमर आणि दीपक हुडा हे खेळाडू संघाची कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरले होते.

राहुल, सिद्धार्थ, संदीप प्रमुख आकर्षण

सातव्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावात अ, ब, क आणि नवे खेळाडू अशा चार श्रेणींत एकूण १९ राज्यांचे ४४२ खेळाडू बोलीसाठी उपलब्ध असतील. यापैकी १३ देशांच्या ५३ परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. लिलावाआधी ११ संघांनी २१ खेळाडूंना आपल्या संघांमध्ये कायम राखले आहे. त्यामुळे लिलावात राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई, रण सिंग, संदीप नरवाल, जयदीप, महेंदर सिंग, परवेश भन्सवाल, रविंदर पहेल, सुरजित सिंग, चंद्रन रणजित, प्रशांत कुमार राय आणि श्रीकांत जाधव यांच्यावर अधिक बोली लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील १३ खेळाडूंवर लक्ष

यंदाच्या लिलावात महाराष्ट्राच्या १३ खेळाडूंवर प्रामुख्याने लक्ष असेल. यापैकी अ-श्रेणीत गिरीश ईर्नाक, रिशांक देवाडिगा, श्रीकांत जाधव आणि सिद्धार्थ देसाई या चौघांचा समावेश आहे, तर ब-श्रेणीत नऊ खेळाडूंचा समावेश आहे. याचप्रमाणे ब-श्रेणीत ऋतुराज कोरवी, सुनील सिद्धगवळी, सचिन शिंगाडे, विशाल माने, काशिलिंग आडके, महेंद्र रजपूत, जी. बी. मोरे, नीलेश साळुंखे, तुषार पाटील यांना स्थान देण्यात आले आहे.

राकेश कुमारकडे हरयाणाचे प्रशिक्षकपद

मागील हंगामात कबड्डीतून निवृत्ती पत्करणाऱ्या अनुप कुमारकडे यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणने प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आता राकेश कुमारनेसुद्धा प्रशिक्षकाचा मार्ग पत्करला आहे. राकेशकडे हरयाणा स्टीलर्सने प्रशिक्षकपद सोपवले आहे.