दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात आज विजेतेपदासाठी लढत

प्रशांत केणी, अहमदाबाद

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची सांगता ही सत्तांतरणाने होणार आहे. दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात शनिवारी ट्रान्सस्टॅडिया क्रीडा संकुलात होणाऱ्या अंतिम लढतीनंतर ‘सत्ता’ कुणाची हे स्पष्ट होऊ शकेल.

दबंग दिल्लीने यंदाच्या हंगामात वर्चस्वपूर्ण कामगिरी करीत गुणतालिकेत अग्रस्थान प्राप्त केले. परंतु बंगाल वॉरियर्सचे आव्हान त्यांना मोडीत काढता आलेले नाही. त्यामुळेच या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दिल्ली आणि बंगाल हे दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून प्रो कबड्डीत असले तरी अंतिम फेरी मात्र प्रथमच खेळत आहेत. बंगालने तिसऱ्यांदा बाद फेरीचा टप्पा ओलांडून ही मजल मारली आहे, तर पहिल्या पाच हंगामांमध्ये साखळीतच गटांगळ्या खाणाऱ्या दिल्लीने सलग दुसऱ्यांदा बाद फेरीत झेप घेतली आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी विजेतेपद महत्त्वाचे ठरणार आहे. बंगालचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले, तेव्हा दिल्लीचे प्रशिक्षक किशन कुमार हुडा त्यांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे गुरू-शिष्यांची आगळी जुगलबंदी मैदानावर पाहायला मिळणार आहे.

यंदाच्या हंगामात बंगाल-दिल्ली यांच्यातील पहिला सामना ३०-३० असा बरोबरीत सुटला, तर दुसऱ्या सामन्यात बंगालने दिल्लीला ४२-३३ अशी धूळ चारली होती. त्या सामन्यात बंगालचा भरवशाचा चढाईपटू मणिंदर सिंगला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानंतरच्या सामन्यांना त्याला मुकावे लागले होते. परंतु अंतिम सामन्यासाठी सज्ज असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

बंगालकडे सांघिक बळ

बंगालकडे तारांकित खेळाडूंचे सांघिक बळ आहे. मणिंदर सिंग (२० सामन्यांत २०५ गुण), के. प्रपंजन (१९ सामन्यांत १०२ गुण) आणि मोहम्मद नबीबक्ष (२२ सामन्यांत ८३ गुण) यांच्या बंगालच्या आक्रमणाची मदार आहे. याचप्रमाणे कठीण प्रसंगात सावरणारा सुकेश हेगडे त्यांच्याकडे आहे. बलदेव सिंग (२३ सामन्यांत ६४ गुण), रिंकू नरवाल (२२ सामन्यांत ६२ गुण) आणि जीवा कुमार यांचा समावेश असलेली बचाव फळी बंगालकडे आहे.

दिल्लीची भिस्त नवीन कुमारवर

सातत्यपूर्ण चढाया करीत प्रतिस्पर्धी संघाचा बचाव खिळखिळा करणाऱ्या नवीन कुमारवर दिल्लीच्या आक्रमणाची भिस्त असेल. यंदाच्या हंगामात त्याने २२ सामन्यांत २८३ चढायांचे गुण मिळवत लक्ष वेधले आहे. चंद्रन रंजितची (२१ सामन्यांत ११६ चढायांचे गुण) तोलामोलाची साथ त्याला लाभते आहे. रवींदर पहेल (२२ सामन्यांत ६२ गुण) आणि कर्णधार जोगिंदर नरवाल (२१ सामन्यांत ४९ गुण) या अनुभवी खेळाडूंवर दिल्लीच्या बचावाची जबाबदारी असेल.

दिल्लीला प्रथमच जेतेपद मिळवून देण्यासाठी आम्ही योग्य रणनीती आखली आहे. विजय किंवा पराभव यापेक्षा रंगतदार सामन्याद्वारे कबड्डीरसिकांना निराश होऊ न देण्याचा आमचा प्रयत्न असेल. नवीन, मणिंदर, पवन यांच्यासारख्या खेळाडूंमुळे भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याची खात्री पटते.

-किशन कुमार हुडा, दबंग दिल्लीचे प्रशिक्षक

आक्रमण आणि बचाव फळीचा उत्तम समन्वय साधणारा संघ विजेता होईल. नशीब हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. प्रो कबड्डीमधून अनेक गुणी खेळाडू उदयास आले आहेत. येत्या काही वर्षांत कबड्डी क्रिकेटला मागे टाकून ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवेल, अशी आशा आहे.

-बी. सी. रमेश, बंगाल वॉरियर्सचे प्रशिक्षक

दिल्लीचा बचावपटू विशाल माने कारकीर्दीत पाचव्यांदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. यापैकी पहिल्या तीन हंगामात यू मुंबाकडून अंतिम सामने खेळताना एक आणि पाटणा पायरेट्सकडून एक अशा दोनदा विजेत्या संघात त्याचा समावेश होता.

बंगालचा जीवा कुमार कारकीर्दीतील चौथ्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. तोसुद्धा पहिल्या तिन्ही हंगामांमध्ये यू मुंबाकडून अंतिम सामने खेळला. यापैकी दोनदा उपविजेतेपद आणि एकदा विजेतेपद त्याने अनुभवले आहे.

१०० बंगालच्या सुकेश हेगडेचा हा प्रो कबड्डीमधील १००वा सामना ठरणार आहे.

२०० दिल्लीच्या विशालला पकडीच्या गुणांचे द्विशतक गाठण्यासाठी तीन गुणांची आवश्यकता आहे.

* सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स हिंदी, स्टार स्पोर्ट्स मराठी.