करोनाच्या साथीमुळे प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम लांबणीवर पडला आहे. दरवर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान होणारी ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, असे संयोजकांकडून शनिवारी स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडले आहे. संपर्काच्या क्रीडा प्रकारांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याने प्रो कबड्डीने त्यांच्या जुलै ते सप्टेंबपर्यंतच्या नियोजित तारखा मागे टाकल्या आहेत. प्रो कबड्डीच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावर म्हटले आहे की, ‘‘करोनामुळे लागू करण्यात आलेली आरोग्यविषयक नियमावली आणि संपर्काच्या क्रीडा प्रकारांबाबत खेळाडूंच्या सुरक्षेबाबतचे धारण यांचा गांभीर्याने विचार करून आम्ही प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहोत. याबाबत आम्ही चाहत्यांची दिलगिरी प्रकट करतो. पुन्हा खेळण्यायोग्य सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यावर हंगामाचे निश्चित आयोजन करू.’’
जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार दीपक निवास हुडा या निर्णयाचे स्वागत करताना म्हणाला, ‘‘खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह आहे. कबड्डीरसिकही या निर्णयाच्या पाठीशी राहतील, अशी आशा आहे.’’
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 2:25 am