प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी पुणेरी पलटणने अशन कुमार यांची प्रशिक्षकपदावर नेमणुक केली आहे. गेल्या काही हंगामांमध्ये दिपक हुडाच्या नेतृत्वाखाली पुणे संघाने प्रो-कबड्डीत आपला ठसा उमटवला आहे. मात्र मोक्याच्या क्षणी अंतिम फेरी गाठण पुणेरी संघाला जमलेलं नव्हतं. मात्र सहाव्या हंगामाकरता पुण्याच्या संघाने नवीन प्रशिक्षकांच्या मदतीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे.

अशन कुमार हे कबड्डीचे नावाजलेले प्रशिक्षक म्हणून ओळखले जातात, याचसोबत त्यांच्याकडे सेनादलाच्या खेळाडूंना प्रशिक्षक देण्याचा मोठा अनुभव आहे. गेली अनेक वर्ष अशन कुमार नाशिक आर्मी स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रशिक्षकाची भूमिका बजावत होते. खेळाडू म्हणूनही अशन कुमार यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे, बिजींग आशियाई खेळ आणि दक्षिण आशियाई खेळांमध्ये अशन कुमार यांनी आपल्या खेळाने भारताला विजेतेपद मिळवून दिलं होतं. ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अशन कुमार यांनी हरियाणाच्या प्रशिक्षकपदाची भूमिका बजावली होती. यावेळी हरियाणाच्या संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती.

गेल्या सहा वर्षांमध्ये प्रो-कबड्डीचं बदलेलं स्वरुप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला अनुभव लक्षात घेऊन, अशन कुमार यांना पुणेरी पलटण संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं संघाचे विशेष कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपाल यांनी म्हटलं आहे. अशन कुमार यांच्या अनुभवाचा पुण्याला फायदा होईल अशी आशा पुणेरी पलटण संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. १९९९ साली अशन कुमार यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.