प्रदीप नरवालच्या वाटय़ाला फक्त ६० लाख, तर अजय ठाकूरला ७६ लाख मानधन
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाच्या लिलावाने पहिल्या हंगामापेक्षा ११ पट मजल मारली आहे. मोनू गोयत, राहुल चौधरी, दीपक निवास हुडा, नितीत तोमर, रिशांक देवाडिगा आणि फझल अत्राचाली या सहा जणांनी एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. मात्र लिलावाच्या नियमाचा व फ्रेंचायझींच्या रणनीतीचा फटका पाटणा पायरेट्सच्या हॅट्ट्रिकचा शिल्पकार प्रदीप नरवाल, रोहित कुमार, सुरजित सिंग, मेराज शेख, संदीप नरवाल, अजय ठाकूर, सचिन कुमार यांच्यासह कायम राखलेल्या मातब्बर २१ खेळाडूंना बसला आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या प्रो कबड्डीच्या लिावात मोनू गोयतने (हरयाणा स्टीलर्स) एक कोटी ५१ लाख रुपयांची बोली जिंकत अव्वल स्थान मिळवले. याशिवाय राहुलने एक कोटी २९ लाख, दीपकने आणि नितीनने एक कोटी १५ लाख, रिशांकने एक कोटी ११ लाख तसेच फझल अत्राचालीने एक कोटी रुपयांची बोली जिंकली. परंतु प्रो कबड्डीच्या लिलावाआधीच संघांनी कायम ठेवलेल्या २१ खेळाडूंना मात्र तोटा सहन करावा लागणार आहे. कारण कायम राखलेल्या खेळाडूंना मागील वर्षीच्या मानधनाच्या १० टक्के अधिक रक्कम देण्यात यावी. याचप्रमाणे लिलावासाठीचा त्यांचा गट बदलल्यास १० टक्के अधिक लाभ त्यांना मिळेल, असा नियम सांगतो.
मागील हंगामात पाटण्याच्या यशात प्रदीपचा सिंहाचा वाटा होता. त्याने २६ सामन्यांत चढायांचे विक्रमी ३६९ गुण कमावले होते. परंतु पाटण्याने कायम ठेवल्यामुळे त्याला फक्त ६० लाख ५० हजार रुपये मानधन मिळणार आहे. बेंगळूरु बुल्सच्या रोहित कुमारनेही २२ सामन्यांत २१९ गुण मिळवत सर्वाधिक चढाईचे गुण मिळवणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान राखले होते. मात्र यंदाच्या हंगामासाठी त्याला ८९ लाख १० हजार मानधन दिले जाणार आहे. बंगाल वॉरियर्सची प्रमुख मदार असणाऱ्या सुरजितला संघाकडून ८० लाख ३० हजार मानधन मिळणार आहे. इराणचा अष्टपैलू खेळाडू मेराजला दिल्ली संघाकडून फक्त ६५ लाख ५५ हजार इतका आर्थिक लाभ होणार आहे. पुणेरी पलटण अष्टपैलू संदीप नरवालसाठी ७२ लाख ६० हजार मोजणार आहेत. भारताचा कर्णधार अजय ठाकूरला तामिळ थलायव्हाज ७६ लाख २३ रुपये देणार आहे. याशिवाय गुजरात फॉच्र्युनजायंट्सन गतहंगामात उपविजेतेपदापर्यंत नेणाऱ्या सचिन कुमारच्या वाटय़ाला फक्त ५६ लाख ८७ हजार रुपये येणार आहेत.
सहा कोटय़धीश, तरी एकूण खर्चात बचत
प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामाच्या लिलावात फ्रेंचायझींनी सहा खेळाडूंना कोटय़धीश करूनही एकंदर खर्चात एक कोटी सहा हजार रुपयांची बचत केली आहे. १२ संघांनी पाचव्या हंगामासाठी २२७ खेळाडूंवर ४६.९९ कोटी रुपये खर्च केले होते. मात्र यंदाच्या हंगामात अतिशय काटेकोरपणे खेळाडू निवडीची प्रक्रिया राबवत १८१ खेळाडूंवर ४५.९३ कोटी रुपये गुंतवले आहेत.
कायम राखलेले मातब्बर खेळाडू
’ बंगाल वॉरियर्स : सुरजित सिंग (८०.३० लाख), मणिंदर सिंग (५६.८७ लाख)
’ बेंगळूरु बुल्स : रोहित कुमार (८९.१० लाख)
’ दबंग दिल्ली : मेराज शेख (६५.५५ लाख)
’ गुजरात फॉच्र्युनजायंट्स : सचिन कुमार (५६.८७ लाख), सुनील कुमार (४९.१० लाख), महेंद्र रजपूत (२४.५५ लाख)
’ हरयाणा स्टीलर्स : कुलदीप सिंग (१०.३४ लाख)
’ पाटणा पायरेट्स : प्रदीप नरवाल (६०.५० लाख), जयदीप (५५ लाख), जवाहर डागर (१३.२ लाख), मनीष कुमार (२९.०५ लाख)
’ पुणेरी पलटण : संदीप नरवाल (७२.६० लाख), राजेश मोंडल (२४.५५ लाख), मोरे जीबी (१३.५७ लाख), गिरीश इर्नाक (४९.१० लाख)
’ तामिळ थलायव्हाज : अजय ठाकूर (७६.२३ लाख), अमित हुडा (६९.२३ लाख), सी. अरुण (३६.३० लाख)
’ तेलुगू टायटन्स : निलेश साळुंखे (५६.८७ लाख), मोहसीन मॅघसोडलॉजाफरी (२४.५५ लाख)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 4:29 am