आयपीएलचा अकरावा हंगाम ऐन रंगात आलेला असताना क्रीडाप्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे. गेले ५ हंगाम क्रीडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वासाठीच्या लिलावाची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत हा लिलाव पार पडला जाणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ४२२ खेळाडूंपैकी ५८ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय असून ५८ खेळाडू हे फ्यूचर कबड्डी हिरो या योजनेमार्फत निवडले जाणार आहेत. इराण, बांगलादेश, जपान, केनिया, कोरिया, मलेशिया, श्रीलंका या देशातील खेळाडूंना यंदाच्या हंगामात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. १२ पैकी ९ संघांनी यंदाच्या हंगामात काही महत्वाच्या खेळाडूंना आपल्या संघात कायम राखलं आहे. सहाव्या हंगामासाठीच्या लिलावात, आयपीएलप्रमाणे Bid to Match कार्डाचा अवलंब केला जाणार आहे. आपल्या संघातील खेळाडूवर एखाद्या संघाने बोली लावल्यास Bid to Match कार्डाद्वारे आधीच्या संघाला आपल्या खेळाडूला संघात कायम राखता येणार आहे. त्यामुळे सहाव्या हंगामात कोणता खेळाडू कोणत्या संघात जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.