05 August 2020

News Flash

प्रो कबड्डी लीग : बंगाल वॉरियर्सची पुन्हा अग्रस्थानी झेप

तमिळ थलायव्हाजवर ३३-२९ अशी मात

| October 10, 2019 03:43 am

तमिळ थलायव्हाजवर ३३-२९ अशी मात; तेलुगु टायटन्सची यूपी योद्धावर सरशी

ग्रेटर नोएडा : मोहम्मद नबिबक्षची अष्टपैलू चमक आणि सुकेश हेगडेने चढाईत केलेल्या कमालीच्या बळावर बंगाल वॉरियर्सने बुधवारी प्रो-कबड्डी लीगमध्ये तमिळ थलायव्हाजवर ३३-२९ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीतील प्रवेश यापूर्वीच निश्चित करणाऱ्या बंगालने या विजयासह गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थान पटकावले. दुसऱ्या सामन्यात तेलुगु टायटन्सने यूपी योद्धावर ४१-३६ अशी मात केली.

विजय सिंग क्रीडा संकुलात झालेल्या पहिल्या लढतीत नबिबक्षने चढायांचे तीन, तर पकडींचे चार असे एकूण सात गुण कमावले. त्याला सुकेशने (६ गुण) चढाईत, तर रिंकू नरवालने (५) बचावात योग्य साथ दिल्यामुळे बंगालने २२ सामन्यांतून हंगामातील १४वा विजय नोंदवला. दुसऱ्या स्थानावरील दबंग दिल्लीपेक्षा (८२) ते एका गुणाने आघाडीवर आहेत. थलायव्हाजतर्फे राहुल चौधरी (७) आणि सागर (५) यांचे प्रयत्न अपुरे पडले. या पराभवामुळे थलायव्हाजचे (२२ सामन्यांत ४ विजय) गुणतालिकेतील शेवटचे स्थान पक्के झाले.

दुसऱ्या लढतीत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या तेलुगु टायटन्सने यूपी योद्धाला धक्का दिला. टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने चढायांचे १५, तर कृष्ण मदनने बचावाचे चार गुण मिळवून मोलाचे योगदान दिले. यूपीकडून श्रीकांत जाधव आणि रिशांक देवाडिगा यांनी चढायांचे प्रत्येकी आठ गुण मिळवूनदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र यूपीने बाद फेरीतील स्थान आधीच सुनिश्चित केले असल्याने या पराभवाचा त्यांच्या समीकरणांवर काहीही प्रभाव पडणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 1:37 am

Web Title: pro kabaddi league bengal warriors beat tamil thalaivas zws 70
Next Stories
1 प्रो कबड्डी लीग : जयपूरच्या विजयात दीपक चमकला
2 नव्या दमाच्या खेळाडूंवर संघांची भिस्त!
3 Pro Kabaddi Season 6 Final : बंगळुरु बु्ल्सची गुजरातवर मात, पवन शेरावत चमकला
Just Now!
X