राकेश कुमारने यू मुंबाक डे स्थलांतरण केल्यानंतर पाटणा पायरेट्स संघाने स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात गरुड भरारी घेतली आहे. बुधवारी पाटण्याने यजमान बंगळुरू बुल्सचा ३३-२४ असा सहज पराभव करून आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. याचप्रमाणे पुणेरी पलटणने ३८-२० अशा शानदार विजयासह आपली बोहनी केली, तर दबंग दिल्लीने ओळीने तिसरा पराभव पत्करला. श्री कोंतीराव स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाटण्याच्या वर्चस्वपूर्ण खेळापुढे बंगळुरूला अखेपर्यंत रणनीती आखता आली नाही. पाटण्याने १६व्या मिनिटाला लोण चढवत पहिल्या सत्रात २०-१० अशी आघाडी मिळवली होती. ही आघाडी दुसऱ्या टप्प्यातसुद्धा त्यांनी टिकवली. पाटण्याच्या रोहित कुमारने चढायांचे ८ गुण मिळवले. त्याला डी. सुरेश कुमार आणि संदीप नरवाल यांच्या पकडींची सुरेख साथ लाभली. बंगळुरू कडून अमित राठीने एकोकी झुंज देत चढायांचे १० गुण मिळवले. तर पवन कुमारने नेत्रदीपक हनुमान उडी घेत नेत्रदीपक चढाईचे दोन गुण मिळवले. दुसऱ्या लढतीत पुणेरी पलटणने दुबळ्या दबंग दिल्लीला हरवताना अनुक्रमे १५व्या आणि ३८व्या मिनिटाला लोण चढवले. दीपक निवास हुडाने चढायांचे नऊ गुण मिळवले. मनजित चिल्लरने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. याशिवाय बदली खेळाडू म्हणून आलेल्या तुषार पाटीलने एको चढाईत तीन गुण मिळवण्याचा पराक्रम दाखवला. दिल्लीचे क्षेत्ररक्षण अतिशय ढिसाळ दर्जाचे झाले, चढाईपटू कोशिलिंग आडके वगळता फोरसे कुणाला यश मिळाले नाही.

Untitled-29