प्रो कबड्डी लीग

हरयाणाचा ३६-३३ असा रोमहर्षक विजय; यूपीची पुण्यावर मात

त्यागराज क्रीडा संकुल, नवी दिल्ली येथे झालेल्या प्रो कबड्डी लीगमधील सोमवारच्या पहिल्या सामन्यात चढाईपटू विकास खंडोलाच्या अप्रतिम चढायांच्या बळावर हरयाणा स्टीलर्सने बंगाल वॉरियर्सवर ३६-३३ अशी मात केली. दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने पुणेरी पलटणला ३५-३० असे पराभूत केले.

विकासने चढायांचे ११ गुण मिळवले, त्याला विनयने नऊ गुण मिळवून सुयोग्य साथ दिली. विकासने प्रो कबड्डीच्या इतिहासात १०व्यांदा एकाच सामन्यात चढायांचे १० गुण मिळवण्याची किमया साधली. बंगालच्या मणिंदर सिंगने चढायांचे १५ गुण कमावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली.  या विजयासह हरयाणाने १० सामन्यांतून सहा विजयांच्या ३१ गुणांसह गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. त्यांनी यू मुंबाला (२९ गुण) तूर्तास मागे टाकले. तर बंगालने (३४ गुण) दुसऱ्या स्थानावरील जयपूर पिंक पँथर्सला (३७ गुण) मागे टाकण्याची संधी गमावली.

दुसऱ्या सामन्यात श्रीकांत जाधवच्या चढायांच्या १५ गुणांमुळे यूपी योद्धाने पुणेरी पलटणवर ३५-३० असा विजय मिळवला. मध्यांतरालाच यूपीने १६-९ अशी आघाडी मिळवली होती. परंतु पुण्याच्या मनजीतने चढायांचे १६ गुण मिळवल्यामुळे सामन्यात एकवेळ २०-१७ अशी चुरस निर्माण झाली होती. परंतु दुसऱ्या सत्रात यूपीने जोरदार मुसंडी मारून पुण्याला मागे टाकले. मनजीतने या सामन्यादरम्यान प्रो कबड्डीतील चढायांच्या ३०० गुणांचा टप्पाही गाठला, मात्र त्यांची  एकाकी झुंज पुण्याला विजयी करण्यात अपयशी ठरली. पुण्याचा हा हंगामातील सहावा पराभव ठरला.