कबड्डी खेळाला प्रत्येक घरामध्ये पोहोचवणाऱ्या प्रो कबड्डीचा थरार पाहण्याची संधी पुणेकरांना गुरुवारपासून मिळणार आहे. या लीगमध्ये येथे पुणेरी पलटण संघाला पाटणा पायरेट्स संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरीत रात्री ८ वाजता हा सामना होणार आहे. पुणे संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी एक सामना त्यांनी जिंकला आहे. दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर पुणे संघ सामना गमावतो हेच आतापर्यंत पाहावयास मिळाले आहे. घरच्या मैदानावर ते पुन्हा विजयपथावर येतील अशी अपेक्षा आहे. त्याकरिता त्यांना पाटणाविरुद्ध सर्वोच्च कामगिरी करावी लागणार आहे. पुणे संघाची मुख्य मदार मनजित चिल्लर व अजय ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंवर आहे. दीपक हुडा, प्रशांत चव्हाण, जसमीर गुलिया व नीलेश साळुंखे यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
पुण्यापेक्षा पाटणा संघाचे पारडे जड आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. साखळी गटात ते अव्वल स्थानावर आहेत. त्यांची भिस्त मनप्रीतसिंग, संदीप नरवाल, दीपक नरवाल व युवराज राणा यांच्यावर आहे.