बंगालवर ३२-२७ असा विजय; जयपूरची तेलुगूवर मात
जगातल्या कुठल्याही मैदानात खेळण्याचे दडपण जेवढे नसते, तेवढे ते घरच्या मैदानावर असते. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमधील अन्य ठिकाणची विजयी घोडदौड घरच्या मैदानात पाटणा पायरेट्स कायम राखणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. पण पाटण्याचा वारू घरच्या मैदानातही उधळला आणि बंगाल वॉरियर्सवर अटीतटीच्या लढतीत ३२-२७ असा विजय मिळवत आपल्या सरसपणाची ग्वाही दिली. आठ सामन्यांमध्ये सात विजयांसह पाटण्याचे ३८ गुण झाले असून, त्यांनी उपांत्य फेरीच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. अन्य एका सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने तेलुगू टायटन्सवर ३५-२६ असा विजय मिळवला.
पाटलीपुत्र क्रीडा संकुलात रंगलेल्या घरच्या मैदानातील पहिल्यात सामन्यात कर्णधार मनप्रीत सिंगने पहिल्याच चढाईत गुण मिळवल्याने पाटण्याच्या संघाचे मनोबल उंचावले होते. १३व्या मिनिटापर्यंत सामना ९-७ अशा रंगतदार अवस्थेत होता. १४व्या मिनिटाला प्रदीप नरवालने चढाईत तीन गुण मिळवत बंगालवर लोण चढवला आणि पाटणाने १४-७ अशी दमदार आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत पाटणाने १८-११ अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून चुका झाल्या. बंगालच्या श्रीकांत जाधवने ३४व्या मिनिटाला चढाईमध्ये तीन गुण मिळवले आणि सामना २५-२४ अशा रंगतदार अवस्थेत आला. पण त्यानंतर पाटणाने अनुभव पणाला लावत सामना जिंकला. उमेश म्हात्रेने अखेरच्या काही मिनिटांमध्ये चांगला खेळ केला खरा, पण त्याची खेळी विजयासाठी तोकडी पडली. पाटणाकडून रोहित कुमारने चढाईमध्ये सहा आणि पकडीमध्ये दोन असे सर्वाधिक आठ गुणांची कमाई केली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये संघाला आघाडी घेण्याची गरज असताना रोहितच पाटणासाठी धावून आला होता.
जयपूरच्या संघाने पहिल्या सत्रात १९-११ अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रातील आततायीपणामुळे त्यांच्या हातून सामना निसटेल असे वाटत होते. पण ३७व्या मिनिटाला लोण चढवत त्यांनी विजय निश्चित केला. जयपूरच्या सोनू नरवालने चढाईत सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली.

आजचा सामना
पाटणा वि. बंगळुरू
वेळ : रात्री ८.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३.