उत्तर प्रदेशमधील बाघपत जिल्ह्यातील मलकपूर गाव हे कुस्तीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावी नवव्या वर्षीच मुलाचे आखाडय़ाशी नाते जुळते. त्यामुळेच मलकपूर गावच्या अनेक कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय शिखरावर लौकिक प्राप्त केला आहे. राजीव तोमर, शोकेंदर तोमर आणि सुभाष तोमर असे तीन अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू हे याच गावचे. शारीरिक तंदुरुस्तीसाठी पालक मुलांना खेळाची दिशा देतात आणि कालांतराने आपल्या गुणवत्तेच्या बळावर ही मुले रेल्वे, पोलीस आणि सेनादलात प्रामुख्याने नोकरीला दिसतात. नितीन तोमरसुद्धा आधी कुस्ती खेळायचा. त्याचे दोन सख्खे काका अशोक आणि प्रल्हाद तोमर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू. परंतु नितीनने शालेय जीवनात कुस्तीऐवजी कबड्डीची वाट निवडली. आता वयाच्या २१व्या वर्षी तो प्रो कबड्डीच्या क्षितिजावर तेजाने तळपत आहे. भारताकडून विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पध्रेत खेळून अर्जुन पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न त्याने जीवापाड जोपासले आहे.
नितीनच्या कुटुंबात खेळासाठी अतिशय पूरक वातावरण होते. शाळेत कुस्ती हा खेळ नव्हता, परंतु कबड्डी होता. सातवीला असताना नितीनने कबड्डी खेळायला प्रारंभ केला. शालेय संघातून खेळायला लागल्यानंतर त्याची ही आवड अधिकच वाढत गेली. मग याच खेळात रस निर्माण झाला. गावी वडील जितेंदर तोमर यांच्याकडून कबड्डीचे प्राथमिक धडे त्याने गिरवले. मग जिद्दीने वाटचाल करताना उत्तर प्रदेश राज्याकडून तो राष्ट्रीय स्पध्रेत खेळला. त्यानंतर सप्टेंबर २०१२मध्ये तो सेनादलात रुजू झालो. आता सेनादलात नवीन कुमार यांच्याकडून मार्गदर्शन मिळते आहे. गेली तीन वष्रे त्यांनी माझ्या खेळाला पैलू पाडले आहेत, असे नितीन आत्मविश्वासाने सांगतो.
सेनादलाच्या खेळाडूंना यंदा प्रथमच प्रो कबड्डीची दारे खुली झाली आहेत. याबाबत नितीन म्हणाला, ‘‘गेली दोन वष्रे मी टीव्हीवर प्रो कबड्डी पाहिले आहे. या व्यासपीठावर गुणवत्ता सिद्ध करण्याची माझीसुद्धा इच्छा होती. परंतु यंदा सेनादलाने परवानगी दिल्याने आम्हाला खेळता आले आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील सामन्यातही हेच सातत्य कायम ठेवेन.’’
नितीनने आपल्या हुकमी चढायांच्या बळावर क्रीडारसिकांचे लक्ष वेधताना चढाईपटूंच्या यादीत अव्वल तिघांमध्ये स्थान मिळवले आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘मेहनत आणि चिकाटी या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या जोडीला सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळवता आले आहे. आता चढाईपटूंमध्ये अव्वल स्थान काबीज करण्याचे माझे ध्येय आहे.’’
चित्रपटांनी नितीनला लष्करात सामील होण्याची प्रेरणा दिली. याबाबत तो उत्साहाने म्हणाला, ‘‘बॉर्डर, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों यांसारख्या चित्रपटांमुळे माझ्या मनात लष्करात दाखल होण्याची इच्छा निर्माण झाली.’’
‘‘प्रो कबड्डीत खेळू लागल्यामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींना अतिशय आनंद होत आहे. त्यांचे खूप सारे संदेश आले आहेत. माझ्यासोबत आतापर्यंतच्या प्रवासात खेळलेल्या खेळाडूंच्या शुभेच्छा येत आहेत. खेळाच्या निमित्ताने होणाऱ्या प्रवासात लोक कौतुकाने पाहतात, सोबत फोटो काढतात, स्वाक्षरी घेतात. त्यामुळे स्वत:चा अभिमान वाटतो,’’ असे नितीनने सांगितले.