प्रो कबड्डीतील विक्रमवीर प्रदीप नरवालचे भावोद्गार

प्रशांत केणी, मुंबई</strong>

माझ्या यशाचे श्रेय पाटणा पायरेट्स संघातील सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षक राम मेहेर सिंह यांच्या पाठबळाला जाते. त्यामुळेच खेळ उंचावून हा ऐतिहासिक टप्पा मी गाठू शकलो, अशा भावना प्रदीप नरवालने व्यक्त केल्या. सोमवारी तमिळ थलायव्हाजविरुद्धच्या सामन्यात प्रदीपने प्रो कबड्डी लीगमधील दोन विक्रम साकारले. एकूण (चढाया आणि पकड) आणि चढायांच्या एक हजार गुणांचा टप्पा गाठणारा तो  पहिला कबड्डीपटू ठरला.

प्रो कबड्डीत एक हजार गुण मिळवण्याचे लक्ष्य पक्क केले होते का, या प्रश्नाला उत्तर देताना प्रदीप म्हणाला, ‘‘मला विश्वासच बसत नाही. प्रो कबड्डी लीगमध्ये एक हजार गुणांचा टप्पा गाठायचे, असे ठरवून अजिबात खेळत नव्हतो. प्रो कबड्डीचा पाचवा हंगाम माझ्या कारकीर्दीसाठी महत्त्वाचा ठरला. मी ३६९ गुणांची कमाई करीत गुणांच्या शर्यतीत जोरदार मुसंडी मारली. त्या वेळी स्वत:च्या गुणवत्तेची मला जाणीव झाली.’’

राहुल चौधरी आणि दीपक निवास हुडा यांच्याशी असलेल्या गुणांच्या शर्यतीत प्रदीपने सुरुवातीचे अपयश मागे टाकत नंतर जोरदार मुसंडी मारली. यासंदर्भात प्रदीपने सांगितले की, ‘‘राहुलशी गुणांशी असलेली स्पर्धा अत्यंत निकोप आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत राहुल सर्वाधिक गुणांच्या स्पर्धेत अग्रेसर होता. परंतु आता मी त्याला मागे टाकले आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे.’’

पहिल्या हंगामात प्रदीप नव्हता. मग दुसऱ्या हंगामात त्याने बेंगळूरु बुल्सकडून  प्रो कबड्डीत पदार्पण केले. त्यानंतर तिसऱ्या हंगामापासून पाटण्याकडून खेळताना त्याचे गुणांचे सातत्य अविरत सुरू आहे. याविषयी प्रदीप म्हणाला, ‘‘ज्या संघाचा बचाव भक्कम असतो, त्यांचे आक्रमणसुद्धा उत्तम असते. कारण चढाईपटू बाद झाल्यावर त्याला पुन्हा मैदानावर आणण्याचे कौशल्य हे बचावपटूकडे किंवा अन्य चढाईपटूकडे असते. हे कबड्डीतील मर्म मला ठाऊक आहे. त्यामुळे माझ्या यशात सहकारी खेळाडू आणि मार्गदर्शकांचा सिंहाचा वाटा आहे.’’

गेले पाच हंगाम पाटणा पायरेट्सकडून खेळणारा प्रदीप संघाशी जुळलेल्या भावनिक नात्याविषयी म्हणाला की, ‘‘पाटण्याकडून गेली पाच वर्षे खेळल्याने ऋणानुबंधाचे नाते निर्माण झाले आहे. याच प्रकारचे नाते प्रशिक्षक राम मेहेर सिंह यांच्याशी आहे.’’