घरच्या मैदानातील अखेरच्या सामन्यात दमदार विजय मिळवत बंगळुरू बुल्सने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बंगळुरू आणि तेलुगू टायटन्स या दाक्षिणात्य संघांमधील युद्धात बंगळुरूने ४३-२९ असा सहज विजय मिळवला. याचप्रमाणे रोमहर्षक सामन्यात अखेर यू मुंबाने पाटणा पायरेट्सवर ३२-२७ असा विजय मिळवत ५५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले.बंगळुरूने सामन्याच्या सुरुवातीपासूनच नेत्रदीपक खेळ करत टायटन्सवर वर्चस्व मिळवले होते. बंगळुरूच्या अजय ठाकूरने सहाव्या मिनिटाला चढाई करत टायटन्सवर पहिला लोण चढवला आणि संघाला १०-२ अशी आघाडी मिळवून दिली. हाच आक्रमकपणा कायम ठेवल्यामुळे मध्यंतराला बंगळुरूकडे १९-९ अशी दमदार आघाडी होती आणि जवळपास विजय निश्चित केला होता. २४व्या मिनिटाला बंगळुरूने दुसरा लोण चढवत २२-१० अशी मोठी आघाडी घेतली. यानंतर आक्रमक रूप धारण करत टायटन्सने ३३व्या मिनिटाला बंगळुरूवर लोण चढवलाही, पण त्यांना विजयापासून मात्र वंचित राहावे लागले. बंगळुरूने ३९व्या मिनिटाला टायटन्सवर तिसरा लोण नोंदवत आघाडी वाढवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळुरुचा कर्णधार मनजित चिल्लरने चमकदार कामगिरी करत एकूण ९ गुणांची कमाई केली.सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमार बाद झाला. त्यानंतर पाटणाने ४-० अशी आघाडी घेतली होती. पण यू मुंबाच्या शब्बीर बापूने दोन गुण मिळवत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दमदार खेळ करत यू मुंबाने नवव्या मिनिटाला ६-६ अशी बरोबरी केली आणि १२व्या मिनिटाला पाटणावर पहिला लोण चढवत १२-६ अशी आघाडी घेतली. २०व्या मिनिटाला चढाई करताना अनुप कुमार बाद झाला. तब्बल सहा मिनिटे तो बाहेरच होता, पण २६व्या मिनिटाला रिशांक देवाडिगाने चढाईत गुण मिळवत अनुपला मैदानात आणले. अनुपने त्यानंतर दमदार खेळ करत आघाडी वाढवण्याचे काम चोखपणे केले आणि ३४व्या मिनिटाला यू मुंबाने पाटणावर दुसरा लोण चढवत २९-१८ अशी आघाडी घेतली. या लोणनंतर पाटणाचा संघ तडफेने मैदानात उतरला आणि त्याने आक्रमक खेळत करत ३९व्या मिनिटाला यू मुंबावर लोण चढवला आणि मुंबापेक्षा ते (२७-२९) अशा दोन गुणांनी पिछाडीवर होते. पण त्यानंतर यू मुंबाने चाणाक्षपणे अनुभवाच्या जोरावर पाटणाला एकही गुण मिळवू दिला नाही आणि दुसरीकडे तीन गुण मिळवत सामना जिंकला. यू मुंबाकडून अनुप व सुरेंदर नाडा यांनी प्रत्येकी ६ गुण पटकावले, तर मोहित चिल्लरने एका ‘सुपर टॅकल’सह पाच गुण मिळवले.