घरच्या मैदानावर खेळताना चाहत्यांचा मिळालेला पाठींबा आणि शेवटच्या सेकंदापर्यंत दिलेली लढत, या जोरावर यजमान बंगाल वॉरियर्स संघांने गतविजेत्या पाटणा पायरेट्स संघावर मात केली. शेवटच्या क्षणी सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवत बंगालने पाटणा पायरेट्सला ४१-३८ अशा फरकाने हरवलं.

कोलकाता शहारात नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात खेळवल्या गेलेल्या या सामन्याचा खरा हिरो ठरला तो मणिंदर सिंह. मणिंदरने आजच्या सामन्यात बंगालकडून चढाईमध्ये सर्वाधिक १३ गुणांची कमाई केली. सुरुवातीपासून या सामन्यात पाटणा पायरेट्सचं पारडं जड होतं. मात्र मणिंदरने आपल्या वादळी खेळीमुळे बंगालचं आव्हान सामन्यात कायम ठेवलं. पाटणा पायरेट्सच्या संघातील बचावपटूंना मोक्याच्या क्षणी चूक करायला भाग पाडत मणिंदरने बंगालला सामना जिंकवून दिला. मणिंदरला जँग कून ली, विनोद कुमारने सामन्यात ११ गुणांची कमाई करुन तोलामोलाची साथ दिली.

बंगालच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात चढाईपटूंना चांगली साथ दिली. पहिल्या सत्रात दबकून खेळत असलेल्या बचावफळीने दुसऱ्या सत्रात चांगला खेळ करत पाटणाच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात पकडलं. रणसिंह, श्रीकांत तेवतिया यांनी पाटणाच्या प्रदीप नरवाल, मोनू गोयतसारख्या खेळाडूंवर अंकुश लावत सामना आपल्याकडे खेचून आणला.

पाटणा पायरेट्सकडून कर्णधार प्रदीप नरवालने अष्टपैलू खेळ केला. प्रदीपने चढाईमध्ये ११ गुणांची कमाई केली. त्याला बदली खेळाडू विनोद कुमारने ८ गुण तर मोनू गोयतने ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र मोक्याच्या क्षणी आपला चांगला फॉर्म कायम ठेवणं पाटणा पायरेट्सच्या संघाला जमलं नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रात पाटणा पायरेट्सने आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र अखेरच्या सत्रात पाटणाचे चढाईपटू सपशेल फेल ठरले. आपल्या संघाकडे असलेली आघाडी कायम ठेवण्यात पाटणा पायरेट्सला जमलं नाही. यामुळे पिछाडीवर असलेल्या बंगालने सामन्यात बाजी मारली.

बचावपटूंची निराशाजनक कामगिरी हे आजच्या सामन्यातील पाटणा पायरेट्सच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं. विशाल माने आणि जयदीप यांनी सामन्यात काही चांगले पॉईंट मिळवले, मात्र एकाही बचावपटूंच्या खेळात सातत्य दिसलं नाही. विशेषकरुन दुसऱ्या सत्रात विशाल माने, जयदीप सारख्या खेळाडूंना बंगालला अक्षरशः गुण बहाल केले. त्यामुळे हातात असलेला सामना पाटणा पायरेट्सला बंगालच्या संघाला बहाल करावा लागला. या विजयामुळे बंगाल वॉरियर्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर खेळण्याचा बंगालच्या संघाला फायदा होतो का हे पहावं लागणार आहे.