सलग सहा पराभवांचा सामना करावा लागल्यानंतर अखेर बंगळुरु बुल्सच्या संघाला आज विजय मिळाला आहे. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगळुरुने हा सामना २४-२० अशा फरकाने जिंकला. पुणेरी पलटणच्या संघाकडून आजच्या सामन्यात चढाईपटूंना हवातसा खेळ करता आला नाही. या कारणामुळेच पुण्याला आज पराभवाचा सामना करावा लागला.

उत्कृष्ट चढाईपटू हा पुण्याच्या संघाचा आतापर्यंतचा आधारस्तंभ मानला जात होता. मात्र बंगळुरुच्या बचावपटूंनी पुण्याच्या चढाईपटूंना आपल्या जाळ्यात बरोब्बर अडकवलं. कर्णधार दीपक हुडा, राजेश मोंडल, मोनू या चढाईपटूंना पुण्याच्या संघाकडून खेळताना फारसा प्रभाव दाखवता आला नाही. पुण्याच्या बचावपटूंनी मात्र आजच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली. बचावफळीने आज सामन्यात ९ गुणांची कमाई केली, मात्र चढाईपटूंची योग्य साथ न मिळाल्याने सामन्यात परतणं त्यांना शक्य झालं नाही.

दुसरीकडे रविंदर पेहलच्या परतण्याने बंगळुरुच्या बचावफळीच्या खेळात आज एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतं होता. मैदानात तरुण खेळाडूंच्या खेळात त्या आत्मविश्वासाची झलकही पहायला मिळाली. महेंदर सिंह, प्रीतम छिल्लर, कुलदीप सिंह या त्रिकुटाने पुण्याच्या चढाईपटूंना गुण कमावण्याची संधीच दिली नाही. रोहीत कुमार, अजय कुमार आणि सुनील जयपाल या खेळाडूंनी चढाईत बंगळुरुच्या संघाची धुरा सांभाळत सामना आपल्या हातात कायम राहिलं याची खबरदारी घेतली.

बचावफळीत बंगळुरुकडून कुलदीप सिंहने ५, महेंदर सिंहने ४ गुणांची कमाी केली. तर चढाईत अजय कुमार आणि रोहीत कुमारने ३-३ गुणांची कमाई केली आणि अष्टपैलू खेळाडू सुनील जयपालने ४ गुणांची कमाई करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.