तब्बल ११ गुणांची पिछाडी भरुन काढत घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दबंग दिल्लीच्या संघाने गतविजेच्या पाटण्याला चांगली लढत दिली. मात्र अखेरच्या क्षणी केलेल्या हाराकिरीमुळे बरोबरीत आलेला सामना दबंग दिल्लीला गमवावा लागला. घरच्या मैदानावर दिल्लीच्या पराभवाची मालिका सुरुच आहे. ३६-३४ च्या फरकाने दिल्लीवर मात करत पाटणा पायरेट्सने आपला विजयी फॉर्म कायम राखला आहे.

सुरुवातीपासून सामन्यावर पाटणा पायरेट्सने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. पहिल्या सत्रात सामना सुरु झाल्याच्या अडीच मिनीटांनंतर दबंग दिल्लीला ऑलआऊट करण्यात पाटण्याचा संघ यशस्वी झाला. पहिल्या सत्रात पाटण्याकडे तब्बल ११ गुणांची आघाडी होती. मात्र दबंग दिल्लीने हळूहळू सामन्यात पुनरागमन करत आपली पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मिराज आणि अबुफजलच्या जोडीने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला आक्रमक खेळ करत पाटण्याला बरोबरीत रोखण्यात यश मिळवलं.

मात्र सामना संपण्यासाठी अवघी काही मिनीटं शिल्लक असताना पाटण्याचे प्रशिक्षक राम मेहर सिंह यांनी आपल्या संघाला सामन्याचा वेग कमी करायला सांगितला. प्रशिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे खेळ करत पाटण्याने अखेरच्या मिनीटांमध्ये दिल्लीवर बाजी पलटवत यजमान संघाला सामन्यात दुसऱ्यांदा ऑलआऊट केलं. यानंतर दिल्लीने अखेरच्या काही सेकंदांमध्ये पुन्हा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

पाटण्याकडून कर्णधार प्रदीप नरवालने चढाईत १४ गुणांची कमाई केली. त्याला मोनू गोयत आणि विजय यांनी चांगली साथ देत संघाच्या विजयात आपला मोलाचा वाटा उचलला. बचावफळीत पाटण्याकडून जयदीप आणि जवाहर डागर यांनी ९ गुण मिळवत चांगली कामगिरी बजावली. मात्र विशाल माने आणि सचिन शिंगाडे या खेळाडूंनी पुन्हा निराशा केली. या दोन्ही खेळाडूंना एकही गुण मिळवता आला नाही.

दबंग दिल्लीकडून अखेरच्या सत्रात कर्णधार मिराज शेखने सामन्यात ८ गुणांची कमाई केली. त्याला अबुफजल मग्शदुलू आणि बदली खेळाडू रोहिल बालियानने चांगली साथ दिली. दुसऱ्या बाजूने आज संघात संधी मिळालेल्या विशालने ७ गुण मिळवत दिल्लीला सामन्यात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र अखेरच्या क्षणी केलेल्या चुका दिल्लीला चांगल्याच महागात पडल्या. दिल्लीकडून बचावफळीत सतपालने ४ गुणांची कमाई केली. मात्र इतर खेळाडूंनी निराशा केली.