प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंट या संघाला पराभवाची धूळ चारली. ५५-३८ असा एकतर्फी विजय मिळवत पाटण्याच्या संघाने प्रो-कबड्डीच्या इतिहासात विजेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली. मात्र या विजेतेपदानंतरही पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहर सिंह आणि गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाचे प्रशिक्षक मनप्रीत यांच्यातलं शीतयुद्ध काही केल्या थांबत नाहीये. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राममेहर सिंह यांनी मनप्रीतला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.

अवश्य वाचा – प्रो कबड्डीचा तीन महिन्यांचा कालावधी अतिशय कंटाळवाणा!

“लागोपाठ मिळत गेलेल्या विजयांमुळे मनप्रीत आणि गुजरातचा संघाच्या वागणुकीत अहंकार यायला लागला. एखाद्या खेळाडू किंवा प्रशिक्षकांसाठी ही सर्वात धोकादायक गोष्ट असते. साखळी फेरीत आम्हाला दोनदा हरवल्यानंतर मनप्रीतच्या वागणुकीत बदल झाला, आम्ही पाटण्याला अंतिम फेरीत सहज हरवु असं म्हणत त्याने आव्हानाची भाषा करायला सुरुवात केली. गुजरातच्या डोक्यात विजयाची धुंदी चढली होती. ज्यावेळी संघ विजयाच्या धुंदीत बेताल वक्तव्य करायला लागतो, अशावेळी त्या संघाचा पराभव जवळ आलेला असतो”, असं राममेहर सिंह म्हणाले. यावेळी उदाहरण देताना राममेहर सिंह यांनी रामायण काळातलं उदाहरण देत मनप्रीतची अप्रत्यक्षपणे रावणाशी तुलना केली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Final – गतविजेत्या पाटणा पायरेट्सची विजयाची हॅटट्रिक, अंतिम फेरीत गुजरातवर मात

माझा संघ या स्पर्धेत दोनवेळा विजेता राहिलेला आहे. मात्र या स्पर्धेत आम्हालाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र माझ्या संघाने प्रत्येक वेळी शांत राहून आमच्या चुका सुधारण्यावर भर दिला. मात्र गुजरात आणि मनप्रीत सिंह वारंवार आम्हाला चिथवण्यासाठी वक्तव्य करत राहिला. एक प्रशिक्षक म्हणून मला या गोष्टीचं वाईट वाटल्याचंही राममेहर सिंह म्हणाले. साखळी सामन्यात आम्ही गुजरातकडून पराभूत झालो, मात्र याचं दडपण न घेता आम्ही चांगला खेळ करत गेलो आणि अंतिम फेरीत आम्हाला याचाच फायदा झाला. त्यामुळे प्रशिक्षकाने आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याकडे नेहमी लक्ष द्यावं, आव्हानाची भाषा करतं फिरणं हे प्रशिक्षकाचं काम नसल्याचा टोलाही राममेहर सिंह यांनी मनप्रीतला लगावला.

अवश्य वाचा – गुजरात-पाटण्याच्या प्रशिक्षकांमध्ये शाब्दिक चकमक, मनप्रीतच्या वक्तव्यावर राममेहर सिंह नाराज