प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात नवोदीत गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने अनुभवी यू मुम्बावर पुन्हा एकदा मात केली आहे. रांचीत खेळवल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातच्या संघाने यू मुम्बावर ४५-२३ अशी मात केली. पाचव्या पर्वात मुंबई आणि गुजरातचा संघ ३ वेळा समोरासमोर आलाय. या प्रत्येक सामन्यात अनुप कुमारच्या यू मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गुजरातने आजच्या सामन्यात कर्णधार सुकेश हेगडेला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधाराच्या अनुपस्थितीचा कोणताही परिणाम गुजरातच्या संघावर झालेला जाणवला नाही. सचिन, चंद्रन रणजीत आणि महेंद्र राजपूत या चढाईपटूंनी मुम्बाच्या बचावफळीला खिंडार पाडलं. रणजितने आजच्या सामन्यात सर्वाधीक ११ गुणांची कमाई केली. त्याला सचिनने १० गुण मिळवत तोडीस तोड साथ दिली. महेंद्र राजपूतनेही चढाई आणि बचावात मिळून ३ गुण मिळवले. यू मुम्बाच्या अतिउत्साही बचावपटूंना आपलं लक्ष्य बनवत गुजरातच्या खेळाडूंनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं.

गुजरातच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. इराणी खेळाडू फजल अत्राचलीने ६ तर त्याचा साथीदार अबुझार मेघानीने ३ गुणांची कमाई करत मुम्बाच्या चढाईपटूंना हतबल करुन सोडलं. सुनील कुमार आणि परवेश भैंसवाल या जोडीनेही सामन्यात आपली चमक दाखवत ३ गुण मिळवले.

यू मुम्बाने आजच्या सामन्यात केलेला खेळ हा निव्वळ निराशाजनक होता. काशिलींग अडके, श्रीकांत जाधव, कर्णधार अनुप कुमार यांना सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. सुरुवातीच्या काही मिनीटांमध्येच हाराकिरी करत मुम्बाने गुजरातला सामना बहाल केला. अखेरच्या सत्रात अनुप कुमारने बचाव आणि चढाईत मिळून ७ गुणांची कमाई केली. मात्र तोपर्यंत गुजरातने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती.

सुरिंदर सिंह, रणजित यासारख्या महत्वाच्या बचावपटूंनी आज गुजरातला अनेक गुण भेट दिले. मध्यरेषेवर प्रतिस्पर्धी खेळाडूला पकडण्याची क्षुल्लक चुक अजुनही मुम्बाचे बचावपटू टाळू शकत नाहीयेत. ज्याचा फटका यू मुम्बाला आजच्या सामन्यात बसलेला पहायला मिळाला. या पराभवानंतर यू मुम्बा गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला असून गुजरातने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी यू मुम्बाकडे आपले यापुढचे सर्व सामने जिंकण्यावाचून कोणताही पर्याय नाहीये.