कर्णधार मिराज शेखने एकाच रेडमध्ये ४ पॉईंट मिळवत दबंग दिल्ली संघाला मिळवून दिलेल्या आघाडीवर खुद्द दिल्लीच्या खेळाडूंनीच पाणी फिरवलं आहे. मोक्याच्या क्षणी रेडर्सने केलेली निराशाजनक कामगिरी, बचावफळीला आलेलं अपयश, शेवटची काही सेकंद शिल्लक असताना रेडर्सना वॉकलाईनलर पकडण्याची केलेली घाई यामुळे दबंग दिल्लीने आपल्या खिशात आलेला सामना स्वतःच्या हाताने गुजरातला बहाल केला.

पहिल्या सत्रापर्यंत दोन्ही संघानी तोडीस तोड खेळ केला होता. काल यू मुम्बाविरुद्ध गुजरातच्या संघाने केलेला खेळ, त्यांना दिल्लीच्या संघाविरुद्ध करता आला नाही. पहिल्या सत्रात १०-१० अशी बरोबरी साधण्यात दोन्ही संघ यशस्वी ठरले होते. दुसऱ्या सत्रातही हा फरक थोड्याफार गुणांच्या अंतराने एकसारखाच होता. मात्र दबंग दिल्लीचा कर्णधार मिराज शेखने सुपर रेडकरत गुजरातच्या ४ खेळाडूंना माघारी धाडलं. यानंतर गुजरातला ऑलआऊट करत दिल्लीने सामन्यात ५ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र दुर्दैवाने ही आघाडी त्यांना टीकवता आली नाही. त्याच सत्रात अवघ्या काही मिनीटात गुजरातच्या संघाने दिल्लीला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर दबंग दिल्लीने पुन्हा सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या बचावफळीने केलेल्या क्षुल्लक चुकांमुळे दिल्लीला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

दबंग दिल्लीकडून कर्णधार मिराज शेखने रेडींगमध्ये ८ गुणांची कमाई केली, त्याला रवी दलालने ५ गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र याव्यतिरीक्त रोहीत बलियान, आर.श्रीराम या खेळाडूंना सामन्यात चमक दाखवता आली नाही. दबंग दिल्लीची बचावफळीही आज फारशी फॉर्मात नव्हती. निलेश शिंदे, सुनील सारख्या अनुभवी खेळाडूंनी छोट्या छोट्या चुका करत पॉईंट गुजरातला बहाल केले. त्यामुळे गुजरातवर दबाव टाकण्यात दिल्लीचा संघ अपयशी ठरला.

दुसरीकडे गुजरातच्या संघाने सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं. कर्णधार सुकेश हेगडेने रेडींगमध्ये ७ गुणांची कमाई केली. त्याला सचिनने ८ तर रोहीत गुलियाने २ गुण मिळवत चांगली साथ दिली. गुजरातच्या संघाचे दोन खांब म्हणून ओळखले जाणारे ईराणी खेळाडू फैजल अत्राचली आणि अबुझर मोहरममेघानी यांनी सामन्यात ४ गुण बचावात मिळवत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. घरच्या मैदानात गुजरातच्या संघाचा हा दुसरा विजय ठरलेला आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये गुजरातचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.