23 November 2017

News Flash

Pro Kabaddi Season 5 – हरियाणाची दिल्लीवर मात

वझीर सिंहचे एका चढाईत ५ गुण

लोकसत्ता टीम | Updated: September 12, 2017 10:46 PM

दबंग दिल्लीचा चढाईपटू आनंद पाटील ( संग्रहीत छायाचित्र )

चढाईपटू वझीर सिंहने एकाच चढाईत कमावलेल्या ५ गुणांच्या बळावर हरियाणा स्टिलर्सने दबंग दिल्लीवर मात केली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हरियाणाने दिल्लीचं आव्हान २७-२४ असं मोडून काढलं. चढाईपटू आणि बचावफळीतल्या खेळाडूंनी अखेरच्या सेकंदापर्यंत सामन्यावरची आपली पकड सुटू दिली नाही. अनुभवी खेळाडूंची कमतरता दबंग दिल्लीला आजच्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली.

सुरुवातीच्या सत्रामध्ये बरोबरीत चाललेल्या सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत आणली ती हरियाणाचा अनुभवी खेळाडू वझीर सिंहने. एकाच चढाईत त्याने दिल्लीच्या ५ खेळाडूंना बाद करत बचावफळीला भगदाड पाडलं. सुरुवातीच्या क्षणांमध्ये बसलेल्या या धक्क्यामुळे दिल्लीला सावरायला खूप वेळ गेला. यानंतर वझीर सिंहवर अंकुश ठेवण्यात दिल्लीच्या खेळाडूंना यश आलं खरं, मात्र अखेरच्या सत्रात संघाला गरज असताना वझीर सिंहने आक्रमक खेळ करत विजय पक्का केला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – निलेश साळुंखेची झुंज व्यर्थ, बंगाल एका गुणाने विजयी

वझीरने सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई केली. त्याला दिपक कुमार दहीयाने ४ तर सुरजीत सिंहने २ गुणांची कमाई करुन चांगली साथ दिली. हरियाणाच्या बचावफळीत आज कर्णधार सुरिंदर नाडाने ४ गुणांची कमाई करत दिल्लीवर दबाव वाढवला. त्याला जीवा गोपाळ, आणि मोहीत छिल्लरने तोलामोलाची साथ दिली.

कर्णधार मिराज शेख, निलेश शिंदे, बाजीवार होडगे या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका दिल्लीच्या संघाला बसला. मिराजच्या अनुपस्थितीत अबुफजल मग्शदुलू, रोहीत बलियान, आनंद पाटील यांनी दिल्लीच्या चढाईची जबाबदारी सांभाळली. मात्र अखेरच्या मिनीटांमध्ये हरियाणाच्या उजव्या कोपऱ्यातील खेळाडूंवर सतत आक्रमण करण्याची युक्ती दिल्लीच्या अंगलट आली. सुरिंदर नाडा आणि जीवा गोपाल या जोडीने पहिले रोहीत बालियान आणि नंतर आनंद पाटीलची पकड करत दिल्लीला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दिल्लीकडून रोहीत बलियानने चढाईत ७ तर अबुफजल आणि आनंद पाटीलने ४-४ गुणांची कमाई केली.

मात्र ज्येष्ठ खेळाडूंना डावलून संधी मिळालेल्या दिल्लीच्या तरुण बचावफळीने आजच्या सामन्यात निराशा केली. स्वप्नील शिंदे, विराज लांडगे, तुषार भोईर या खेळाडूंना सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. अनुभवी खेळाडू सुनील कुमारनेही सामन्यात अवघा १ गुण कमावला. त्यामुळे चांगली लढत देऊनही सामन्यावर आपली मोहोर उमटवण्यात दबंग दिल्लीचा संघ अपयशी ठरला.

 

First Published on September 12, 2017 10:46 pm

Web Title: pro kabaddi season 5 hariyana stealers defeat dabang delhi in last minute thrilling encounter