13 December 2017

News Flash

Pro Kabaddi Season 5 – हरियाणा स्टिलर्सच्या मेहनतीला फळ, गुजरातच्या पदरी पराभव

विकास कंडोलाचा आक्रमक खेळ

लोकसत्ता टीम | Updated: August 8, 2017 9:54 PM

गुजरातच्या चढाईपटूची पकड करताना सुरिंदर आणि मोहीत छिल्लर

प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सच्या संघाला अखेर आपल्या पहिल्या विजयाची चव चाखायला मिळाली आहे. गुजरात फॉर्च्युनजाएंट्स या संघावर हरियाणा स्टिलर्सने ३२-२० अशा फरकाने मात केली. हरियाणाचा या पर्वातला हा पहिला विजय ठरला. आजच्या सामन्यात गुजरातचा संघ हा आपल्या बचावपटूंच्या कामगिरीवर जास्त अवलंबून राहिलेला पहायला मिळाला. याऊलट हरियाणाच्या संघात बचावपटू आणि रेडर्सनी अष्टपैलू कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.

हरियाणाच्या संघाकडून सेनादलाच्या सुरजित सिंहने सामन्याची धडाकेबाज सुरुवात केली. आपल्या पहिल्याच रेडमध्ये सुरिंदरने २ पॉईंट मिळवले. त्यापाठोपाठ गुजरातचा कर्णधार सुकेश हेगडेला हरियाणाच्या बचावपटूंनी आपल्या जाळ्यात अडकवलं, आणि संघाची आघाडी ३-० अशी केली. मात्र हरियाणाकडून रेडींगमध्ये आजच्या सामन्याचा हिरो ठरला तो विकास कंडोला. विकासने आजच्या सामन्यात ६ गुणांची कमाई करत गुजरातच्या बचावफळीत अपरातफर माजवली. हरियाणा स्टिलर्सचा मुख्य चढाईपटू वझीर सिंहला आजच्या सामन्यात केवळ २ पॉईंट मिळवता आले. मात्र त्याने विकास कंडोलाला चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त सुरजित सिंहनेही ३ गुणांची कमाई केली.

पहिल्या सत्रात गुजरातच्या संघाकडून सचिन या खेळाडूने प्रतिकार केला. मात्र त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळाली नाही. सचिनने रेडींगसोबत डिफेन्समध्येही गुजरातसाठी काही पॉईंट मिळवले. हरियाणाचा मुख्य रेडर वझीर सिंह आजच्या सामन्यात अत्यंत बचावात्मक खेळ खेळत होता, मात्र गुजरातच्या खेळाडूंना याचा काही फायदा उचलता आला नाही. गुजरातचा भरवशाचा बचावपटू फैजल अत्राचलीला शांत बसवण्यात हरियाणाचे रेडर्स आज यशस्वी झाले. मात्र फैजलचा इराणी साथीदार अबुझर मोहरममेघानीने आजच्या सामन्यात ३ पॉईंट मिळवत आपला उपयुक्तता सिद्ध केली.

आजच्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचावपटूंनी अष्टपैलू खेळ करत गुजरातच्या खेळाडूंना शांत बसवलं. हरियाणाचे दोन्ही कोपरारक्षक मोहीत छिल्लर आणि सुरिंदर नाडा यांनी गुजरातच्या रेडर्सना आपल्या जाळ्यात अडकवलं. उजवा कोपरारक्षक मोहीत छिल्लरने आजच्या सामन्यात ७ तर त्याचा साथीदार सुरिंदर नाडाने आजच्या सामन्यात ६ पॉईंट मिळवले. या खेळाच्या जोरावर हरियाणाने पहिल्या सत्रात २२-१२ अशी १० गुणांची कमाई केली.

दुसऱ्या सत्रात गुजरातच्या खेळाडूंनी हरियाणाच्या खेळाडूंचा प्रतिकार केला. यात महत्वाची भूमिका बजावली ती महेंद्र राजपूतने. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात महेंद्र राजपूतने ५ गुणांची कमाई करत हरियाणाच्या संघावर ऑलआऊटचं संकट आणलं होतं. मात्र सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लरच्या जोडीने सुपर टॅकल करत आपल्या संघावर ऑलआऊट होण्याचं संकट टाळलं. अखेरच्या सत्रात गुजरातच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र हरियाणाच्या अभेद्य बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही.

First Published on August 8, 2017 9:54 pm

Web Title: pro kabaddi season 5 hariyana stealers vs gujrat fortunegiants match review