News Flash

Pro Kabaddi Season 5 – हरियाणाची तामिळ थलायवाजविरुद्ध बरोबरी, गुजरातचा विजयी धडाका सुरुच

गुजरातचा संघ चांगल्या फॉर्मात

हरियाणाच्या चढाईपटूची पकड करताना तामिळ थलायवाजचा संघ

प्रो-कबड्डीत अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सला तामिळ थलायवाज विरुद्ध बरोबरीत समाधान मानावं लागलं. शेवटच्या काही सेकंदांपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अखेर दोन्ही संघांना २५-२५ अश्या बरोबरीवर समाधान मानावं लागलं. तर दुसऱ्या सामन्या गुजरातच्या संघाने आपला विजयी रथ कायम पुढे नेत घरच्या मैदानावर सलग पाचव्या विजयाची नोंद केली.

हरियाणा स्टिलर्सने आजच्या सामन्याची सुरुवात चांगली केली होती. मात्र संपूर्ण सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवणं हरियाणाच्या खेळाडूंना जमलं नाही. चढाईपटू सुरजित सिंह आणि विकास कंडोला यांनी सामन्यात मिळून ७ गुण मिळवले, मात्र सामना जिंकण्याच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या सत्रात त्यांचा खेळ एकदमच निराशाजनक झाला. तामिळ थलायवाज संघाची बचावफळी ही तितकीशी परिपक्व नाहीये, तरीही हरियाणाच्या चढाईपटूंनी बचावफळीतल्या खेळाडूंवर हल्लाबोल करण्याची तसदीही घेतली नाही. दुसऱ्या सत्रात हरियाणाने केलेला बचावात्मक खेळ अखेरच्या क्षणात त्यांच्यासाठी मारक ठरला. बचावफळीतली सुरिंदर नाडाचा अपवाद वगळता इतर खेळाडूंनी निराशाच केली. कर्णधार सुरींदरने सामन्यात गुण मिळवले, मात्र त्याचा साथीदार मोहीत छिल्लरला सामन्यात अवघा १ गुण मिळवता आला. त्यामुळे सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये सामन्यावर पकड मिळवूनही हरियाणाला सामना जिंकण्यात अपयश आलं.

दुसरीकडे तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरचं मैदानातलं सततचं अपयश हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरतोय. आजच्या सामन्यात अजयला अवघा १ गुण मिळवता आला. के.प्रपंजनने सामन्यात ७ गुण मिळवले खरे, मात्र त्याची एकाकी लढत तामिळ थलायवाजला सामना जिंकवू शकली नाही. कर्णधाराचा गेलेला फॉर्म पाहता, प्रशिक्षकांनी अजयला मैदानाबाहेर बोलवून बदली खेळाडूंना संघात खेळण्याची संधी दिली. मात्र हरियाणाच्या चढाईपटूंप्रमाणेच तामिळच्या खेळाडूंनीही आपल्या फॉर्मात असलेल्या चढाईपटूला साथ दिली नाही. त्यामुळे सामन्यावर पकड घेणं, तामिळ थलायवाजला जमलं नाही. बचावात अमित हुडाचा अपवाद वगळता एकाही बचावपटूला फारसे गुण घेता आले नाही. त्यामुळे हा सामना बरोबरीत सोडवण्यावर दोन्ही संघांनी अखेरच्या काही सेकंदांमध्ये जास्त भर दिला.

तर दुसरीकडे गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने घरच्या मैदानावर खेळताना आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे. तेलगू टायटन्सविरुद्धच्या सामन्यात २९-१९ अशी बाजी मारत गुजरातने आपला पाचवा विजय साजरा केला. कर्णधार सुकेश हेगडेने फॉर्मात येऊन चढाईत ७ गुण मिळवणं, ही गुजरातसाठी आश्वासक बाब ठरली. गेल्या काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही सचिन हा गुजरातच्या संघाचा हिरो ठरलाय. आजच्या सामन्यात सचिनने तब्बल ११ गुणांची कमाई केली. या दोघांनाही अबुझर मेघानी आणि फैजल अत्राचली यांनी सुरेख साथ देत सामन्यात बचावात ७ गुण मिळवले. त्यामुळे सामन्यावर पकड मिळवणं हे गुजरातसाठी सोपं होऊन गेलं.

तर तेलगू टायटन्सचं पाचव्या पर्वातलं दुष्टचक्र काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. कर्णधार राहुल चौधरीसह एकाही खेळाडूला आजच्या सामन्यात सूर सापडला नाही. त्यामुळे संपूर्ण सामन्यात तेलगूचा संघ एकदाही गुजरातचा प्रतिकार करताना दिसला नाही. राहुल चौधरीला आज केवळ ३ गुणांवर समाधाना मानावं लागलं, तर निलेश साळुंखेही आज फारशी चमक दाखवू शकला नाही. निलेशला आज अवघा १ गुण मिळाला. जी तऱ्हा चढाईपटूंची तीच बचावपटूंचीही, रोहीत राणा, विशाल भारद्वाज यासारख्या चढाईपटूंनाही आजच्या सामन्यात गुजरातच्या खेळाडूंवर अंकुश लावणं जमलं नाही. सचिन आणि सुकेश हेगडेच्या खेळापुढे तेलगूचे बचावपटू हतबल झालेले पहायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात तेलगूसाठी स्पर्धेतलं आव्हान कठीण होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 11:39 pm

Web Title: pro kabaddi season 5 hariyana stealers vs tamil thalayvas and gujrat fortunegiants vs telgu titans match review
टॅग : Pro Kabaddi Season 5
Next Stories
1 चेंडू डोक्याला लागून क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानी फलंदाजाचा मृत्यू
2 रशियन टेनिस सुंदरी शारापोव्हाला अमेरिकन खुल्या स्पर्धेत ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
3 श्रीनगरच्या लाल चौकात वंदे मातरम् म्हणणाऱ्या महिलेला सुरेश रैनाचा सलाम!
Just Now!
X