प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात बंगळुरु बुल्सचा प्रवास साखळी फेरीतच संपलेला आहे. रविवारी पुण्याच्या बालेवाडी परिसरातील शिवछत्रपती मैदानात बंगळुरुने उत्तर प्रदेशचा पराभव केला. मात्र आपल्या विजयाचं अंतर ७ पेक्षा जास्त गुणांनी ठेवण्यात अपयशी ठरल्याने उत्तर प्रदेशचा संघ प्ले-ऑफच्या फेरीत दाखल झाला, आणि सामना जिंकूनही बंगळुरुला पराभव स्वीकारावा लागला.

या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार रोहित कुमारने आश्वासक खेळ केला. चढाईत १३ गुणांची कमाई करत त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. मात्र मोक्याच्या क्षणी रोहित कुमारची उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी पकड करत आपल्या पराभवाचं अंतर कमी केलं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित कुमारने आपल्या संघाच्या पराभवाची जबाबदारी घेतली.

” गरज असताना आपला संघ मोठ्या फरकाने सामने जिंकू शकला नाही. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यातही आम्ही ५ जणं उरलो होतो, पण मी क्षुल्लक चुक केल्यामुळे बाद झालो आणि त्याचा फायदा समोरच्या संघाने घेतला. त्या चढाईत मी कोणत्याही प्रकारची घाई न करता माघारी परतलो असतो तरी आमचा संघ मोठ्या फरकाने सामना जिंकू शकला असता. माझी हीच चूक आम्हाला महागात पडल्याचं, रोहितने मान्य केलं.”

आमचे प्रशिक्षक आम्हाला खेळाची गती कमी करा असं वारंवार सांगत होते. मात्र त्यावेळी सामन्यात ज्या प्रकारे तणाव होता तो पाहता आम्ही प्रशिक्षकांनी दिलेल्या सुचना पाळू शकलो नाही. एक कर्णधार म्हणून अशा प्रसंगी माझ्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती, मात्र तसा खेळ करण्यात मी कमी पडलो. पत्रकारांशी बोलताना रोहितने आपली चूक मान्य केली.