आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या हरियाणा स्टिलर्सला बरोबरीत रोखण्यात जयपूर पिंकपँथर्स संघाला यश आलंय. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना अखेर २७-२७ अशा बरोबरीत सुटला. हा सामना बरोबरीत सुटला असला तरीही हरियाणाच्या गुणतालिकेतील स्थानावर कोणताही परिणाम पडलेला नाहीये, अ गटात हरियाणा ४९ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.

हरियाणाच्या संघाने आज कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लर या आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. आजच्या सामन्यात दिपक कुमार दहीयाने संघाचं नेतृत्व केलं. दिपक दहीयाने आजच्या सामन्यात ७ गुणांची कमाई केली. त्याला सुरजीत सिंहने ६ तर बदली खेळाडू मयुर शिवतरकरने ३ गुणांची कमाई केली. दोन्ही महत्वाच्या बचावपटूंच्या अनुपस्थितीत आज हरियाणाचे अन्य बचावपटू कसा खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र बचावफळीला आपला फारसा प्रभाव पाडता आला नाही.

सुरुवातीचा काहीकाळ जयपूरचा संघ सामन्यात पिछाडीवर पडला होता. मात्र नितीन रावल आणि पवन कुमारने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत सामन्याचं पारडं जयपूरच्या दिशेने फिरवलं. नितीनने सामन्यात १२ गुणांची कमाई केली, त्याला पवन कुमारने ४ गुण मिळवत चांगली साथ दिली. या दोन्ही खेळाडूंच्या खेळामुळे अखेरच्या सत्रात जयपूरचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला.

या दोन्ही खेळाडूंव्यतिरीक्त मनजीत छिल्लर, जसवीर सिंह यांनी २-२ गुणांची कमाई करत संघाला सामना बरोबरीत सोडवण्यात हातभार लावला. सध्या ही स्पर्धा उत्तरार्धाकडे झुकलेली असताना जयपूरचं उपांत्य फेरीत पोहचणं कठीण मानलं जातंय. त्यामुळे आगामी काळात जयपूरचा संघ कसा खेळेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.