प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वाचे विजेते ठरलेल्या पाटणा पायरेट्सने बाद फेरीच्या सामन्यातही आपला विजयी फॉर्म कायम राखला आहे. मुंबईतल्या एनएससीआयच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पाटणा पायरेट्सने हरियाणा स्टिलर्सचा ६९-३० असा धुव्वा उडवला. या विजयासह पाटणा पायरेट्सने पुढच्या फेरीत प्रवेश केला असून त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी पुणेरी पलटण संघाचा सामना करावा लागणार आहे. पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवालने या सामन्यात चढाईत सर्वाधीक ३४ गुण मिळवण्याचा विक्रम केला. हा प्रो-कबड्डीच्या हंगामातला आतापर्यंतचा सर्वात जास्त गुण मिळवण्याचा विक्रम ठरला आहे.

गतविजेत्या पाटणा पायरेट्सने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिल्या मिनीटापासून सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं. यात महत्वाची भूमिका बजावली पाटण्याचा कर्णधार प्रदीप नरवाल आणि मोनू गोयत यांनी…प्रदीप आणि मोनूने हरियाणाच्या भक्कम बचावफळीला खिंडार पाडत सामन्यात आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. हरियाणाकडून विकास कंडोलाने पाटण्याला टक्कर देण्याचा चांगला प्रयत्न केला, मात्र त्याला इतर खेळाडूंची हवी तशी साथ लाभली नाही.

हरियाणाच्या चढाईपटूंचा खेळ बघून प्रशिक्षकांनी बदली खेळाडू प्रशांत कुमार रायला संघात जागा दिली. प्रशांतने सामन्यात काही सुरेख गुण मिळवले. मात्र प्रदीप नरवालने पहिल्याच सत्रात पाटण्यावर ऑलआऊट होण्याची वेळ आणली. विकास कंडोलाने आपल्या संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाटण्याच्या खेळाडुंपुढे त्याचा काही निभाव लागला नाही. अखेर पहिल्या सत्राच्या अखेरीस पाटणा पायरेट्सचा संघ २२-१५ अशा गुणांच्या फरकाने आघाडीवर होता.

दुसऱ्या सत्रात हरियाणाच्या खेळाची मदार ही प्रामुख्याने प्रशांत कुमार रायवर पहायला मिळालेली. वझीर सिंहचं चढाईतलं अपयश हरियाणाच्या संघासाठी चिंतेची बाब ठरत होतं. एका बाजुने विकास कंडोला आपल्या संघाची कमान सांभाळायचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचे एकट्याचे प्रयत्न कामी आले नाही. अखेर पाटणा पायरेट्सचा संघ दुसऱ्या सत्रात हरियाणा स्टिलर्स संघाला दुसऱ्यांदा ऑलआऊट करण्यात यशस्वी ठरला. संघाची गाडी रुळावर येण्यासाठी हरियाणाच्या प्रशिक्षकांनी संघात अनेक बदल करुन पाहिले, मात्र पाटण्याच्या खेळाडूंपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

यानंतर हरियाणाच्या संघाने सामन्यात आपला पराभव मान्य केला. सामना संपण्यासाठी जवळपास ९ मिनीटांचा वेळ बाकी असतानाच हरियाणाचे खेळाडू सहज गुण बहाल करायला लागले. हरियाणाच्या या कमकुवत बचावफळीचा फायदा घेत पाटण्याने चढाई आणि बचावात हरियाणाला बॅकफूटवर ढकलण्यास सुरुवात केली. त्यातच दुसऱ्या सत्रात प्रदीप नरवालने एकाच चढाईत हरियाणाच्या संघाला सर्वबाद करण्याचा भीमपराक्रम करत हरियाणाच्या सामन्यात परतीचे दोर कापून टाकले. दरम्यान प्रदीप नरवालने या सामन्यात एकाच चढाईत ८ गुण आणि या हंगामात चढाईत ३०० गुण मिळवण्याचा पराक्रम केला.