कर्णधार दिपक हुडाचा आक्रमक खेळ आणि त्याला अन्य चढाईपटू आणि बचावपटूंनी दिलेली साथ या जोरावर पुणेरी पलटणने हरियाणा स्टिलर्सवर मात केली. ३८-२२ अशा फरकाने पुणेरी पलटणने हरियाणा स्टिलर्सचा घरच्या मैदानावर धुव्वा उडवला.

आजच्या सामन्यात पुणेरी पलटणकडून विजयाचा शिल्पकार ठरला तो दिपक हुडा. दिपकने आजच्या सामन्यात चढाईत १३ गुणांची कमाई केली. त्याच्या या खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणकडे पहिल्या सत्रात १६ गुणांची आघाडी होती. राजेश मोंडल आणि संदीप नरवालने त्याला चांगली साथ दिली. यामुळे पुणेरी पलटणने आजच्या सामन्यावर वर्चस्व कायम राखलं होतं.

आजच्या सामन्यात पुण्याच्या बचावपटूंना आपलं कौशल्य दाखवण्याची फारसी संधी मिळाली नाही. मात्र मिळालेल्या संधीचं पुण्याच्या बचावपटूंनी सोनं केलं. गिरीश एर्नेकने सामन्यातक २ गुणांची कमाई केली. त्याला अन्य खेळाडूंनीही चांगली साथ दिली.

हरियाणा स्टिलर्सकडून आजच्या सामन्यात दिपक दहीयाचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. दिपकने सामन्यात ११ गुणांची कमाई केली. मात्र प्रशांत राय, वझीर सिंह यांना फारशी चमक दाखवता आली नाही. दीपक दहीयाने अखेरच्या सत्रात केलेल्या चढायांच्या जोरावर हरियाणाने २० गुणांचा टप्पा ओलांडला.

हरियाणाच्या बचावपटूंनीही आजच्या सामन्यात निराशाजनक खेळ केला. कर्णधार सुरिंदर नाडा, मोहीत छिल्लर यांना फक्त ४ गुण मिळवता आले. पुण्याच्या चढाईपटूंवर अंकुश लावणं हरियाणाच्या खेळाडूंना जमलं नाही. त्यामुळे पुणेरी पलटणला आजच्या सामन्यात विजय मिळवणं सोपं झालं.