प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला नेहमीप्रमाणे लोकांचा प्रतिसाद मिळतोय, मात्र गेल्या काही सामन्यांपासून रेफ्रींच्या चुकीच्या निर्णयामुळे या सामन्यांमधली मजा काहीशी कमी होताना दिसतेय. याआधी तेलगू टायटन्स, जयपूर पिंक पँथर्स यासारख्या संघाना रेफ्रींच्या चुकीच्या आणि एकतर्फी निर्णयाचा फटका बसला होता. त्यानंतर यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारनेही आता प्रो-कबड्डीतल्या रेफ्रींच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

प्रो-कबड्डीत सर्वाधीत गाजलेला संघ म्हणून ओळखला जाणारा यू मुम्बा सध्या आपल्या घरच्या मैदानावर खेळतो आहे. मात्र घरच्या मैदानात पहिले दोन्ही सामने यू मु्म्बाने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने मुम्बाच्या संघावर ३९-३६ अशी मात केली. तर दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने मुम्बावर २६-२४ अशी मात केली. जयपूरविरुद्धच्या सामन्यात यू मुम्बाने पिछाडी भरुन काढत चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जसवीर सिंहच्या खेळापुढे मुम्बाची डाळ शिजू शकली नाही.

जयपूरविरुद्धच्या सामन्यात जसवीर सिंह हा मुम्बाच्या खेळाडूंना सतत स्लेजिंग करत होता. सामन्यादरम्यान जसवीर आणि मुम्बाच्या कुलदीप सिंहमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र अनुप कुमारच्या म्हणण्यानूसार रेफ्रींनी जसवीरच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं. “प्रो-कबड्डीत सामना सुरु होण्याआधी रेफ्री दोन्ही संघांना खेळाचा आदर करायला सांगतात. मात्र जसवीर हा ज्या प्रकारे वागत होता, आमच्या खेळाडूंना उद्देशून स्लेजिंग करत होता हे गैर होतं. यावर पंचांनी आक्षेप घेणं गरजेचं होतं. जसवीरचं वागणं हे कारवाईस पात्र ठरत होतं, मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. यादरम्यान माझ्या खेळाडूला मध्ये छोटीशी दुखापतही झाली, पण तरीही या प्रकाराकडे रेफ्रींनी लक्ष दिलं नाही.” अनुपने रेफ्रींच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली.

या सामन्यात जसवीरने चढाईमध्ये १० गुणांची कमाई केली. मात्र अनुप कुमारच्या मते हे गुण जसवीरला आमच्या बचावपटूंनी बहाल केलेले होते, त्यात जसवीरची काही मेहनत नव्हती. याआधीही लखनऊमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या सामन्यावेळी हादी ताजीकने केलेली पकड नाकारत समोरच्या संघाला बहाल केलेले पॉईंट, बंगालच्या सामन्यात दिपक नरवालला ‘Yello Card’ दाखवत सामन्यात २ मिनीटासाठी केलेलं निलंबन हे रेफ्रींच्या चुकीच्या निर्णयाचे गेल्या काही दिवसांमधले नमुने आहेत.

अवश्य वाचा – आम्हाला गुजरातने नाही, पंचांनी हरवलं ! जयपूरचे प्रशिक्षक पंचांवर नाराज

रेफ्रींनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी कालावधीत प्रो-कबड्डीतले रेफ्री आपली कामगिरी सुधारतात का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – मी तुमचं काय घोडं मारलंय? निलेश साळुंखेचा पंचांना सवाल