प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. सलामीच्या सामन्यामध्ये तेलगु टायटन्सने नवोदीत तामिळ थलायवाजचा पराभव केला. तर ज्या सामन्याकडे सर्व कबड्डीप्रेमींचं लक्ष होतं, त्या सामन्यात पुणेरी पलटणने यू मुम्बाचा ३३-२१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यू मुम्बा हा प्रो-कबड्डीच्या आतापर्यंतच्या पर्वातला सगळ्यात यशस्वी संघ ओळखला जातो, त्यामुळे सलामीच्या सामन्यात अशा पद्धतीने झालेला पराभव मुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरला.

मात्र मुंबईत यंदाच्या हंगामात पुनरागमन केलेल्या शब्बीर बापू या खेळाडूने पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. ‘स्पोर्ट्सकिडा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शब्बीर बापूने ही कबुली दिली आहे. पहिल्या ३ पर्वात मुम्बाचा सदस्य असलेल्या शब्बीरला चौथ्या पर्वात जयपूरच्या संघाने विकत घेतलं होतं. मात्र पाचव्या पर्वात त्याचं मुंबईच्या संघात पुनरागमन झालंय. संपूर्ण संघ काल सामन्यात चांगला खेळला, मात्र मला हवातसा खेळ करता आला नाही. त्यामुळे यू मुम्बाच्या पराभवाला आपण जबाबदार असल्याचं शब्बीर बापूने सांगितलं आहे.

“मी जेव्हा जेव्हा रेड करायला जात होतो, बाद होऊन संघाबाहेर जात होतो. प्रशिक्षक आम्हाला चांगला खेळ करण्यासाठी सतत प्रोत्साहन देत होते, मात्र माझ्याकडून हवा तसा खेळ झाला नाही”, असं म्हणतं शब्बीरने पराभवाची जबाबदारी आपल्यावर घेतली. अनुप कुमारने याआधी संघाच्या बैठकीदरम्यान आपण मुख्य रेडरची भूमिका बजावणार नसल्याचं सांगत, यंदा नवीन खेळाडूंनी पुढाकार घ्यायचा असं सांगितलं होतं. मात्र तरीही अनुप संघात असणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं. मात्र आम्ही चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे अनुपला सामन्याची सुत्र सांभाळावी लागली, असंही शब्बीर बापू म्हणाला.

मात्र हा केवळ पहिला सामना होता, आगामी सामन्यात पुनरागमन करुन यू मुम्बा या पर्वातही अव्वल संघ ठरेल अशी आशा यावेळी शब्बीर बापूने व्यक्त केली. या स्पर्धेतला यू मुम्बाचा दुसरा सामना रविवारी हरियाणा स्टिलर्स या संघाशी होणार आहे.