प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात या पर्वातला नवोदीत संघ तामिळ थलायवाजने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगळुरु बुल्सच्या संघावर तामिळ थलायवाजने २९-२४ अशी मात केली. तेलगू टायटन्सपाठोपाठ बंगळुरु बुल्सचीही आपल्या घरच्या मैदानावरची कामगिरी फारशी उल्लेखनीय राहिलेली नाहीये.

अवश्य वाचा – प्रो-कबड्डीचा दबदबा कायम, पहिल्या आठवड्यात १३ कोटी लोकांच्या घरात प्रवेश

बंगळुरुच्या संघाने आजच्या सामन्यात नेहमीच्या चुकीची पुनारवृत्ती केली. कर्णधार रोहीत कुमारचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला आश्वासक खेळ करता आला नाही. रोहीतने चढाईत १२ गुणांची नोंद केली. या पर्वातली रोहीत कुमारची १० किंवा १० पेक्षा जास्त गुण मिळवण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. मात्र बंगळुरुच्या बाकीच्या खेळाडूंची त्याला साथ लाभली नाही. काल बंगालविरुद्धच्या सामन्यात एका चढाईत ४ गुण घेऊन सामन्याचं पारड फिरवणाऱ्या अजय कुमारकडून आजच्या सामन्यात अनेक अपेक्षा होत्या. मात्र आजच्या सामन्यात त्यानेही निराशाच केली.

बचावफळीत बंगळुरुचा भरवशाचा उजवा कोपरारक्षक रविंदर पेहेल आणि आशिष कुमार यांनी मिळून ७ गुणांची कमाई केली. प्रितम छिल्लर आणि महेंद्र सिंह यांचं अपयश बंगळुरुच्या संघासाठी मारक ठरलं. त्यामुळे अनेकदा प्रत्यत्न करुनही बंगळुरुचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पुणेरी पलटणला पराभवाचा धक्का, जयपूर पिंक पँथर्स विजयी

दुसरीकडे तामिळ थलायवाजच्या संघातल्या तरुण खेळाडूंनी आज दमदार खेळ केला. तामिळचा कर्णधार अजय ठाकूर आजच्या सामन्यात अपयशी ठरला. बंगळुरुच्या बचावापुढे त्याला एकही गुण मिळवता आला नाही. यामुळे प्रशिक्षकांनी कर्णधाराला संघाबाहेर बसवत तरुण खेळाडूंच्या हाती संघाची कमान दिली. त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलला. के.प्रपंजन विनीत कुमार आणि कोरियाचा डाँग जिऑन लीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत, चढाईमध्ये पॉईंट मिळवले. या तिघांच्या झंजावातापुढे बंगळुरुचा संघ ऑलआऊटही झाला.

तामिळ थलायवाजसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे, संघाचा उजवा कोपरारक्षक अमित हुडा आजच्या सामन्यात आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परत आला. अमित हुडाने अखेरच्या सत्रात बंगळुरुचा कर्णधार रोहीत कुमारला सुंदर डॅश करत बराच वेळ संघाबाहेर ठेवलं. अजय कुमारलाही अमित हुडाने केलेले टॅकल हे उल्लेखनीय होते. अमितला सी. अरुण आणि डी. प्रताप या जोडगोळीने ५ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली.

यंदा प्रो-कबड्डीचा कालावधी हा ३ महिन्यांचा असल्यामुळे प्रत्येक संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी भरपूर संधी मिळणार आहेत. आपल्या पहिल्याच पर्वात तामिळ थलायवाजच्या संघाने केलेला खेळ हा वाखणण्याजोगा आहे. त्यामुळे आपल्या आगामी सामन्यात तामिळ थलायवाजचा संघ स्पर्धेतील दादा संघांना कशी टक्कर देतो हे पहावं लागणार आहे.