कर्णधार राहुल चौधरीचा आक्रमक खेळ आणि त्याला मराठमोळ्या निलेश साळुंखेने दिलेली साथ या जोरावर तेलगू टायटन्सने जयपूर पिंक पँथर्सवर मात केली. ४१-३४ अशा फरकाने जयपूरवर मात करत तेलगू टायटन्सने उपांत्य फेरीत आपल्या प्रवेशासाठीचे दरवाजे खुले ठेवले आहेत. जयपूरच्या महत्वाच्या खेळाडूंनी केलेला निराशाजनक खेळ हे जयपूरच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं.

पहिल्या मिनीटापासून तेलगू टायटन्सने सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. कर्णधार राहुल चौधरीने सामन्यात १७ गुणांची कमाई करत जयपूरच्या बचावफळीला खिंडार पाडलं. त्याला निलेश साळुंखेने ७ तर इराणचा बदली खेळाडू मोहसीन मग्शदुलूने ४ गुणांची कमाई करत आपल्या कर्णधाराला मोलाची साथ दिली. तेलगू टायटन्सकडून बचावफळीत विशाल भारद्वाजने ५ गुणांची कमाई केली. त्याला सोमबीरने ४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. जयपूरच्या महत्वाच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचं महत्वाचं काम तेलगू टायटन्सच्या बचावपटूंनी आजच्या सामन्यात केलं.

जयपूर पिंक पँथर्सच्या महत्वाच्या खेळाडूंनी आजच्या सामन्यात निराशाजनक खेळ केला. जसवीर सिंहला आजच्या सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. कर्णधार मनजीत छिल्लर सामन्यात अवघा एक गुण मिळवू शकला. दुखापतीतून सावरलेल्या सेल्वामणीला आज दुसऱ्या सत्रात संघात जागा देण्यात आली, मात्र आपली छाप सोडण्यात तो देखील अयशस्वी ठरला. जयपूरकडून पवन कुमारने सामन्यात तब्बल १७ गुण कमावले. मात्र इतर खेळाडूंकडून साथ न मिळाल्याने जयपूरला पराभवाचा सामना करावा लागला.