22 November 2017

News Flash

Pro Kabaddi Season 5 – निलेश साळुंखेची झुंज व्यर्थ, बंगाल एका गुणाने विजयी

तेलगूच्या बचावफळीच्या क्षुल्लक चुका

लोकसत्ता टीम | Updated: September 12, 2017 9:40 PM

तेलगू टायटन्सच्या निलेश साळुंखेचे सामन्यात १० गुण

कर्णधार राहुल चौधरीचं सामन्यातलं अपयश आणि अखेरच्या सेकंदात बचावपटूंनी केलेल्या हाराकिरीमुळे तेलगू टायटन्सला एका गुणाने हार पत्करावी लागली. अखेरच्या सेकंदात बंगाल वॉरियर्सच्या जँग कून लीने चढाईत एका गुणाची कमाई करत ३२-३१ अशा फरकाने सामना आपल्या संघाच्या झोळीत घातला.

मराठमोळ्या निलेश साळुंखेचा अपवाद वगळता तेलगू टायटन्सच्या खेळाडूंनी आज निराशाजनक खेळ केला. निलेशने सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई केली, मात्र कर्णधार राहुल चौधरीला सामन्यात फक्त ४ गुण कमावता आले. बहुतांश वेळा राहुल चौधरी बंगालच्या बचावफळीचा शिकार झाला. त्यामुळे सामन्यात काही क्षणांसाठी आलेली आघाडी तेलगू टायटन्सच्या संघाला टिकवता आली नाही. चढाईत निलेश आणि राहुलचा अपवाद वगळता तेलगूचा संघ सामन्यात ईराणी खेळाडूंवर अवलंबून राहिला, मात्र त्यांना हवीतशी कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू विकासला संघात जागा देण्यात आली. त्याने २ गुणांची कमाई करत संघाचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला.

तेलगू टायटन्सच्या बचावफळीलाही आज फारसा प्रभाव दाखवता आला नाही. रोहीत राणा, सोमबीर, मोहसीन मग्शदुलू, फरहाद यासारख्या खेळाडूंना बचावात अवघे ५ गुण मिळवता आले. उजवा कोपरारक्षक विशाल भारद्वाजने सामन्यात ४ गुणांची कमाई केली. मात्र अखेरच्या सेकंदांमध्ये केलेली क्षुल्लक चुक तेलगू टायटन्सला चांगलीच महागात पडली.

बंगालकडून आजच्या सामन्यात हिरो ठरला तो कोरियाचा जँग कून ली. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासून कोरियन खेळाडूने चढाईत आपली छाप सोडली. तेलगू टायटन्सच्या बचावफळीतील महत्वाच्या खेळाडूंना जँग ने सहज लक्ष्य बनवत सामन्यात ९ गुण मिळवले. त्याला दुसऱ्या बाजूने मणिंदर सिंहने ७ आणि विनोद कुमारने ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

बंगालच्या बचावफळीत कर्णधार सुरजीत सिंहने केलेला खेळ आश्वासक होता. विशेषकरुन प्रतिस्पर्धी कर्णधार राहुल चौधरीला सुरजीतने प्रत्येकवेळी डॅश करत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. सुरजीतने बचावात ५ गुणांची कमाई केली. त्याला रणसिंहने २ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या विजयासह बंगाल वॉरियर्सने ब गटात ५० गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. तर तेलगू टायटन्स ३० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे स्पर्धेच्या अखेरच्या सत्रात तेलगू टायटन्सचा संघ पुनरागमन करतो का हे पहावं लागणार आहे.

First Published on September 12, 2017 9:40 pm

Web Title: pro kabaddi season 5 telgu titans loose the thrilling match by 1 point bengal moves to 1st position