कर्णधार राहुल चौधरी, निलेश साळुंखे आणि मोहसीन मग्शदुलू या त्रिकुटांनी केलेल्या खेळाच्या जोरावर तेलगू टायटन्सने तामिळ थलायवाजवर मात केली. ५८-३७ अशा फरकाने सामन्यात विजय मिळवत तेलगू टायटन्स अजुनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे.

संपूर्ण सामन्यात तेलगू टायटन्सचं वर्चस्व दिसून आलं. कर्णधार राहुल चौधरीने सामन्यात १६ गुणांची कमाई केली. त्याला मोहसीन मग्शदुलूने १२ तर निलेश साळुंखेने ११ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. याव्यतिरीक्त फरहाद, रोहीत राणा आणि विशाल भारद्वाज या बचावफळीनेही गुणांची कमाई करत तेलगू टायटन्सला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.

बचावफळीची निराशाजनक कामगिरी हे तामिळ थलायवाजच्या पराभवाचं महत्वाचं कारण ठरलं. सी. अरुणचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला सामन्यात गुणांची कमाई करता आली नाही. अरुणच्या नावावरही अवघा १ गुण जमा होता. अमित हुडा, विजीन थंगादुराई, संकेत चव्हाण या सर्व खेळाडूंनी निराशा केली. त्यामुळे तेलगू टायटन्सच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्याचं काम तामिळ थलायवाजला करताच आलं नाही.

तामिळ थलायवाजकडून कर्णधार अजय ठाकूरने चढाईत सर्वाधीक २० गुणांची कमाई केली. त्याला डाँग जिऑन लीने ५ तर के. प्रपंजनने ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या चढाईपटूंच्या जोरावर तामिळ थलायवाजला आपली पिछाडी भरुन काढण्यात काही प्रमाणात यश आलं. मात्र बचावपटूंकडून साथ न मिळाल्याने तामिळ थलायवाजला पराभवाचा सामना करावा लागला.