घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तेलगू टायटन्सला पराभवाचा धक्का देत तेलगू टायटन्सने आजच्या दिवसातल्या दुसऱ्या धक्कादायक विजयाची नोंद केली आहे. या पर्वात तेलगू टायटन्सचा संघ चांगल्या फॉर्मात नाहीये. कामगिरीत सातत्य राखना न आल्याने यंदा तेलगूचा संघ चांगलाच पिछाडीवर पडला. मात्र आजच्या सामन्यात राहुल चौधरीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने यजमान हरियाणा स्टिलर्सवर ३७-१९ अशी मात केली.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – पुण्याची उणे कामगिरी, बंगळुरु बुल्स पुन्हा विजयपथावर

तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरीने फॉर्मात येत १० गुणांची कमाी केली. त्याला मराठमोळ्या निलेश साळुंखेनेही ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. एरवी संथ सुरुवातीमुळे पिछाडीवर पडणाऱ्या तेलगू टायटन्सने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळावर आपला भर दिला. हरियाणाच्या बचावफळीवर सतत हल्ले करत तेलगूने सामन्यात मोठी आघाडी घेतली. हरियाणाच्या दोन्ही कोपऱ्यातील खेळाडूंना आज राहुल चौधरी आणि निलेश साळुंखेने गुण कमावण्याची संधीच दिली नाही. या दोघांना मोहसीन मग्शदुलूने ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली.

चढाईपटूंप्रमाणे या सामन्यात बचावफळीनेही चांगला खेळ केला. उजवा कोपरारक्षक विशाल भारद्वाजने सामन्यात ६ गुणांची कमाई केली. विशाल भारद्वाज हा या पर्वात तेलगू टायटन्ससाठी सातत्याने खेळ करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. विशालला आजच्या सामन्यात सोमबीरने ३ तर रोहीत राणा आणि फरहादने १-१ गुणाची कमाई करत चांगली साथ दिली. चढाई आणि बचावपटूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावरच तेलगू टायटन्सला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणं सोपं झालं.

दुसरीकडे हरियाणाच्या संघाने आज घरच्या मैदानावर खेळताना आपल्या चाहत्यांना चांगलच निराश केलं. अनुभवी चढाईपटू वझीर सिंहचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कालच्या सामन्यात खोऱ्याने गुण कमावणारा प्रशांत कुमार रायही आजच्या सामन्यात फक्त २ गुण मिळवू शकला. याव्यतिरीक्त एकाही खेळाडूला सातत्याने गुणांची कमाई करणं जमलं नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात हरियाणाच्या आक्रमणात कोणतीही धार दिसून आली नाही.

चढाईपटूंप्रमाणे बचावपटूंनीही आज अपेक्षाभंग केला. कर्णधार सुरिंदर नाडा आणि मोहीत छिल्लर या दोन्ही खेळाडूंना आज राहुल आणि निलेश साळुंखेने लक्ष्य बनवत गुणांची कमाई केली. या दोघांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला आजच्या सामन्यातआपल्या गुणांचं खात उघडता आलेलं नाही. या पराभवामुळे हरियाणाच्या गुणतालिकेतील स्थानावर कोणताही परिणाम होणार नसला तरीही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलेली असताना असा बेजबाबदार खेळ करणं हरियाणाला परवडणारं नाहीये. त्यामुळे या पराभवातून हरियाणा योग्य तो धडा घेईल ही आशा.