15 December 2017

News Flash

Pro Kabaddi Season 5 – उत्तरप्रदेशचे योद्धा ठरले सरस, तेलगू टायटन्सचा पराभव

तेलगू टायटन्सकडून राहुल चौधरीची एकाकी लढत

लोकसत्ता टीम | Updated: August 12, 2017 10:45 PM

उत्तर प्रदेशच्या संघाचा अष्टपैलू खेळ

कोणताही संघ हा संपूर्ण सांघिक कामगिरीच्या जोरावर एखाद्या स्पर्धेत विजयी ठरत असतो. नेमकी हीच बाब प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तेलगू टायटन्सचा संघ विसरलेला दिसतोय. पाचव्या पर्वात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका काही केल्या संपत नाहीये. यूपी योद्धाज विरुद्ध झालेल्या सामन्यात आज तेलगू टायटन्सला ३९-३२ अशी हार पत्करावी लागली.

तेलगू टायटन्सकडून नेहमीप्रमाणे कर्णधार राहुल चौधरीने एकट्याच्या जिवावर सामन्यात प्राण फुंकले. संघाचा एकखांबी तंबू बनलेल्या राहुलने आजच्या सामन्यात रेडींगमध्ये १२ गुणांची कमाई केली. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एकाही खेळाडूने राहुल चौधरीला आज साथ दिली नाही. भरवशाच्या निलेश साळुंखेला आजच्या सामन्यात केवळ २ पॉईंट घेता आले. याव्यतिरीक्त विकास आणि राकेश कुमार यांच्याकडून साफ निराशा झाली. दुसऱ्या सत्रात बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या रक्षिथ या खेळाडूने रेडींगमध्ये ६ गुणांची कमाई केली. अखेरच्या सत्रात रक्षित आणि राहुल चौधरीच्या रेडींगमुळे उत्तर प्रदेशच्या संघावर काहीकाळ दबाव आलेला होता. मात्र बचावपटूंच्या सततच्या चुकांमुळे उत्तर प्रदेशने या सामन्यात बाजी मारली.

विशाल भारद्वाजचा अपवाद वगळता तेलगू टायटन्सचा एकही बचावपटू या स्पर्धेत आतापर्यंत आपली चमक दाखवू शकलेला नाहीये. रोहीत राणा, राकेश कुमार यांना आजच्या सामन्यात बचावात केवळ ३ पॉईंट मिळवता आले. विशाल भारद्वाजने ४ गुणांची कमाई करत उत्तर प्रदेशच्या रेडर्सना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र राहुलप्रमाणे त्यालाही इतर खेळाडूंची साथ न मिळाल्यामुळे उत्तर प्रदेशचा संघ सामन्यात वरचढ ठरला.

उत्तर प्रदेशच्या संघाने मात्र अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करत सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती. कर्णधार नितीन तोमरने आपली जबाबदारी पुरेपूर निभावत सामन्यात रेडींगमध्ये १० गुणांची कमाई केली. त्याला मुंबईकर रिशांक देवाडीगाने ६ आणि महेश गौडने २ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. उत्तर प्रदेशच्या बचावपटूंनीही आपल्या रेडर्सना चांगली साथ देत संघाच्या विजयात हातभार उचलला.

आजच्या सामन्यातल्या पराभवातून तेलगू टायटन्सला एक गुण मिळाला असला तरीही सतत होणाऱ्या पराभवामुळे त्यांचं आगामी काळात स्पर्धेतलं आव्हान आता खडतर होत जातंय. त्यामुळे यापुढच्या सामन्यांमध्ये तेलगू टायटन्सचा संघ आपल्या चुकांमधून काही शिकतो की नाही हे पहावं लागणार आहे.

First Published on August 12, 2017 9:42 pm

Web Title: pro kabaddi season 5 telgu titans vs up yoddha match review