प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वाने आपली प्रेक्षकसंख्या कायम ठेवत क्रिकेटलाही मागे टाकलं आहे. या पर्वात ४ नवीन संघांचा समावेश झाल्यामुळे ही स्पर्धा चुरशीची होत जातेय. काही नवीन खेळाडूंनी यंदाच्या पर्वात आपल्या कामगिरीने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. तर पहिल्यांदाच प्रो-कबड्डीत आलेल्या गुजरात संघानेही चमकदार कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली.

मात्र यंदाच्या पर्वाला पंचांच्या खराब कामगिरीचं आणि वादग्रस्त निर्णयांचा डाग लागला आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पंचांच्या कामगिरीबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली. प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात आतापर्यंत पंचांकडून देण्यात आलेल्या ४ वादग्रस्त निर्णयांवर हा एक प्रकाशझोत….

१) अनुप कुमार विरुद्ध जसवीर सिंह

प्रो-कबड्डीत अनुप कुमार हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र यंदाच्या पर्वात पंचांच्या काही निर्णयामुळे अनुपने मैदानात आपली नाराजी व्यक्त करुन दाखवली.

घरच्या मैदानावर खेळताना जयपूरविरुद्धच्या सामन्यात मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी जसवीर सिंह सतत मुम्बाच्या खेळाडूंना चिथावत होता. मुम्बाच्या कुलदीपसोबत जसवीरची बाचाबाचीही झाली. मात्र पंचांनी यावेळी जसवीरला साधी समज दिली नाही. सामना संपल्यानंतर अनुपने याबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली.

२) रविंदर पेहलला रेड कार्ड

बंगाल वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात बंगळुरु बुल्सचा उजवा कोपरारक्षक रविंदर पेहलने बंगालच्या जँग कून लीची पकड केली. यावेळी एखाद्या चढाईपटूची पकड केल्यानंतर ५ ते ६ सेकंदांच्या आत पंचांना तो खेळाडू बाद आहे की नाही याचा निर्णय घ्यायचा असतो. मात्र या सामन्यात पंचांनी ५ सेकंदानंतरही निर्णय घेतला नाही, ज्यामुळे जँग कून लीला मध्यरेषा पार करण सोपं पडलं.

पंचांच्या या निर्णयाविरोधात रविंदर पेहलने आपली नाराजी व्यक्त केली. मात्र यावेळी रविंदरची बाजू ऐकून न घेता पंचांनी त्याला रेड कार्ड दाखवल्याचा आरोप बंगळुरुचा कर्णधार रोहीत कुमारने केला होता.

३) प्रदीप नरवाल ‘कॉपीकॅट’ – राकेश कुमार

पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने प्रो-कबड्डीत ‘डुबकी’ हे तंत्र विकसित केलं. मात्र पत्रकारांशी बोलताना यंदाच्या हंगामात तेलगू टायटन्सकडून खेळणाऱ्या राकेश कुमारने ‘डुबकी’ हे तंत्र आपलं असल्याचं सांगत, प्रदीपने आपली कॉपी केल्याचं वक्तव्य केलं.

यावर पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहर सिंह यांनी राकेशला स्वतःच्या मर्यादेत राहायला सांगितलं. यापुढे जात राममेहर यांनी आपण राकेशच्या खेळात कधीही मैदानात ‘डुबकी’ हे तंत्र वापरताना बघितलं नसल्याचं सांगितलं.

४) पाण्याच्या बाटलीवरुन रणकंदन –

ऑगस्टमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये बंगळुरु बुल्सला पाटणा पायरेट्स संघाकडून पराभव स्विकारावा लागला. यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयावर बंगळुरुचे प्रशिक्षक रणधीर सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. यादरम्यान रणधिर सिंह आणि पंचांमध्ये बाचाबाचीही झाली होती.

सामना संपल्यानंतर कळालेल्या माहितीनूसार, पंचांनी रणधीर सिंह यांना मैदानावर पडलेली पाण्याची बाटली उचलण्यास सांगितली. मात्र रणधीर सिंह यांनी ते काम करायला नकार दिला. एखाद्या संघाच्या प्रशिक्षकाला पंच मैदानावर पडलेली बाटली उचलायला कशी सांगू शकतात, असा सवाल रणधीर सिंह यांनी विचारला होता. या वादानंतर पंचांनी रणधिर सिंह यांना काही काळासाठी मैदानाबाहेर जायची शिक्षा दिली होती.