प्रो-कबड्डीने अनेक खेळाडूंना प्रसिद्धी मिळवून दिली. ज्या खेळाडूंना देशात कोणीही ओळखत नव्हतं, ते खेळाडू आता देशवासियांच्या गळ्यातला ताईत बनलेले आहेत. अनुप कुमार, मनजीत छिल्लर, काशिलींग अडके, निलेश शिंदे, राहुल चौधरी, अजय ठाकूर हे खेळाडू आता देशातल्या तरुणांचे युथ आयकॉन्स म्हणून ओळखले जातात.

यांच्यासोबत काही तरुण खेळाडूंनाही प्रो-कबड्डीने चांगली प्रसिद्धी मिळवून दिली. पाटणा पायरेट्सकडून खेळणारा प्रदीप नरवालही असाच एक खेळाडू, आपल्या उपयुक्त खेळामुळे पाटणाने पाचव्या हंगामात प्रदीप नरवालला आपल्या संघात कायम ठेवलं होतं. आपल्या उत्कृष्ट चढाईच्या जोरावर प्रदीपने आतापर्यंत प्रो-कबड्डीत काही विक्रम आपल्या नावे केले आहेत, जे आतापर्यंत अनुप कुमार आणि इतर खेळाडूंनाही जमलेलं नाही.

१. सर्वाधिक गुण मिळवूनही संघाची हार –

प्रो-कबड्डीचा तिसरा हंगाम हा बचावपटूंच्या कामगिरीने गाजला होता. या हंगामात एकाही चढाईपटूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. मात्र पाटणा पायरेट्सकडून खेळणाऱ्या प्रदीप नरवालने चढाईपटूंची ही कोंडी मोडली. दबंग दिल्लीविरुद्ध खेळताना प्रदीप नरवालने एका सामन्यात चढाईत तब्बल २४ गुणांची कमाई केली. यासोबत प्रदीपने काशिलींग अडकेच्या एका सामन्यात सर्वाधिक चढाईचे गुण मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. मात्र पाटणा पायरेट्सच्या बचावपटूंनी केलेल्या हाराकिरीमुळे पाटणाला सामना गमवावा लागला.

२. प्रो-कबड्डीतला सर्वात तरुण कर्णधार –

वयाच्या १८ व्या वर्षी प्रदीप नरवालने प्रो-कबड्डीत पदार्पण केलं. दोन वर्षांमध्येच प्रदीपने आपल्या खेळाने संघ व्यवस्थापनाचा विश्वास जिंकून घेतला. त्याने केलेल्या कामगिरीमुळे वयाच्या २० व्या वर्षीच पाचव्या पर्वात प्रदीप नरवालला पाटणा पायरेट्सचा कर्णधार बनवण्यात आलं. सध्या प्रदीप आपला संघ ज्या पद्धतीने हाताळतो आहे, ते पाहून संघाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं दिसतंय.

३. हंगामात सर्वात जलद ५० गुण –

आपल्या मॅरेथॉन रेडच्या जोरावर प्रदीप नरवाल प्रतिस्पर्धी संघातील बचावपटूंना अक्षरशः सळो की पळो करुन सोडतो. यंदाच्या हंगामात अवघ्या ४ सामन्यांमध्ये प्रदीप नरवालने चढाईत ५० गुणांची कमाई केली आहे.

४. एका हंगामात चढाईत पाचवेळा १० गुणांची कमाई –

पाटणा पायरेट्सने तिसऱ्या आणि चौथ्या हंगामात प्रो-कबड्डीचं विजेतेपद मिळवलं. यात प्रदीप नरवालचा सर्वात मोठा वाटा होता. चौथ्या हंगामात प्रदीप नरवालने पाचवेळा चढाईत १० किंवा १० पेक्षा जास्त गुणांची कमाई केली होती. याचसोबत पाचव्या हंगामातही प्रदीप नरवालने असा कारनामा केला आहे.

५. प्रो-कबड्डी इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सरासरी –

चौथ्या हंगामात प्रदीप नरवालने १६ सामन्यात ८ च्या सरासरीने गुणांची कमाई केली होती. पाचव्या हंगामात आतापर्यंत अर्धा खेळ झाला आहे. आणि अशा परिस्थितीतही प्रदीप नरवालने १२ च्या सरासरीने गुणांची कमाई केली आहे. आतापर्यंत एकाही चढाईपटूला सरासरीत असा दुहेरी आकडा गाठता आलेला नाहीये.