खेळ कोणताही असो, त्यात कर्णधाराची भूमिका ही महत्वाची असते. क्रिकेट, फुटबॉल सारख्या खेळांमध्ये कर्णधाराला आपल्या संघासमोर एक चांगल्या खेळाडूचं उदाहरण घालून द्यायचं असतं. कठीण प्रसंगामध्ये आपलं डोकं शांत ठेऊन संघाला विजय कसा मिळवून द्यायचा, हे प्रत्येक कर्णधाराचं पहिलं ध्येय असतं. मग या सगळ्यात कबड्डी कशी मागे राहिलं. प्रो-कबड्डीतल्या यू मुम्बाचा कर्णधार अनुप कुमारच्या मते, आपल्या संघाला सतत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहनं देणारा खेळाडू कबड्डीचा चांगला कर्णधार बनू शकतो. जर कर्णधाराने संघाला, आपण सामने जिंकू शकतो असा विश्वास दिला नाही; तर संघाला मैदानात चांगली कामगिरी करणंही कठीण होऊन बसतं.

प्रो-कबड्डीच्या आतापर्यंतच्या इतिहासात यू मुम्बा आणि या संघाचा कर्णधार अनुप कुमार ही  सर्वात यशस्वी जोडगोळी मानली जात आहे. प्रो-कबड्डीच्या नवीन पर्वानिमीत्ताने लोकसत्ता ऑनलाईनशी अनुप कुमारने खास संवाद साधला. अनुपच्या गाठीशी भारताला कबड्डी विश्वचषक आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकवून देण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

याआधी अनुपने अनेक वेळा, येत्या ४-५ वर्षात कबड्डी भारतामध्ये क्रिकेटची जागा घेईल असा अंदाज वर्तवला होता. याबद्दल विचारलं असता अनुप म्हणाला, “माझ्यामते कबड्डी हा ३० सेकंदाचा खेळ आहे. या ३० सेकंदामध्ये तुम्हाला कशी रेड करायची आहे, समोरच्या खेळाडूला कसं आऊट करायचं आहे याचा निर्णय घ्यायचा असतो. या ३० सेकंदांमध्ये तुम्ही जर योग्य निर्णय घेऊ शकलात तर तुम्ही संघाला विजय मिळवून देऊ शकता, याच गोष्टीमुळे कबड्डी आता लोकांच्या  घराघरात पोहचली आहे. लोकांना झटपट सामने बघायला आवडत असल्याचंही”, अनुप म्हणाला.

प्रो-कबड्डीत अनुप कुमारच्या कामगिरीनंतर देशात अनेक खेळाडू कबड्डीकडे वळले. प्रो-कबड्डीत संघ कोणताही असो, प्रत्येक खेळाडू सामन्याआधी येऊन अनुपचे आशिर्वाद घेतो. काही नवोदीत खेळाडू अनुपच्या पाया पडतात, मात्र अनुप त्यांना असं करण्यापासून थांबवतो आणि त्यांच्या खेळाविषयी त्यांना काही टिप्स देतो.

प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वात मुम्बाला पुणेरी पलटणकडून २१-३३ अशी हार पत्करावी लागली. मात्र अनुपवर याचा फार काही परिणाम जाणवतं नव्हता. पहिल्या पराभवनंतर आपण आपल्या संघाला याचा फार विचार करु नका असा सल्ला दिल्याचं अनुप म्हणाला. आपण हरलोय याचा सारखा विचार करत राहिलो तर पुढच्या सामन्यात आपण चांगल खेळू शकणार नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना, जेवणाच्या वेळी मी प्रत्येक खेळाडूसोबत गप्पा मारत त्यांना अधिकाधीक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक सामन्यात प्रेक्षकांकडून आपल्याला उर्जा मिळत असल्याचं सांगत अनुपने, सामन्यात आपल्याला कधीही टेन्शन येत नसल्याचं सांगितलं.

आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही अनुप कुमारने दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या संघाचा एका गुणाने पराभव केला. त्यामुळे अनुप कुमारच्या नसा-नसांमध्ये कबड्डी कशी भिनली आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – यू मुम्बाच्या विजयात सांगलीचा काशिलींग चमकला